IPL 2019 : मुंबईच्या टीममध्ये अल्झारी जोसेफची एन्ट्री

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईच्या टीममध्ये नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

Updated: Mar 28, 2019, 02:07 PM IST
IPL 2019 : मुंबईच्या टीममध्ये अल्झारी जोसेफची एन्ट्री title=
फोटो सौजन्य : मुंबई इंडियन्स

मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईच्या टीममध्ये नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर अल्झारी जोसेफचा मुंबईच्या टीममध्ये समावेश झाला आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ऍडम मिलने दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो आयपीएलच्या संपूर्ण मोसमाला मुकणार आहे. मिलनेच्या जागी मुंबईने बदली खेळाडू म्हणून अल्झारी जोसेफची निवड केली आहे.

२०१६ सालच्या अंडर-१९ वर्ल्ड कपवेळी अल्झारी जोसेफ प्रकाशझोतात आला. २०१६ सालच्या वर्ल्ड कपमध्ये जोसेफने ६ मॅचमध्ये १३ विकेट घेतल्या. यामध्ये भारताविरुद्धच्या फायनलमधल्या ३ विकेटचाही समावेश आहे. या कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. याच वर्ल्ड कपमध्ये जोसेफने इशान किशनलाही आऊट केलं होतं. आता दोघं मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये एकत्र असतील.

अल्झारी जोसेफने आत्तापर्यंत ७ टी-२० मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्याने १७ च्या स्ट्राईक रेटने ९ विकेट घेतल्या आहेत. ४/४१ ही त्याची सर्वोत्तम बॉलिंग कामगिरी आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोसेफने १५ वनडे आणि ९ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. जोसेफने १५ वनडेमध्ये २४ विकेट आणि ९ टेस्टमध्ये २५ विकेट घेतल्या आहेत.

अल्झारी जोसेफची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली असली तरी तो मैदानात कधी उतरेल याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती मुंबईच्या टीमने दिलेली नाही. जोसेफबरोबरच मुंबईच्या टीमला आणखी एक दिलासा मिळाला आहे. लसिथ मलिंगाला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. वर्ल्ड कप लक्षात घेता श्रीलंकेमधल्या स्थानिक वनडे स्पर्धेत खेळणं श्रीलंकेनं बंधनकारक केलं होतं. पण बीसीसीआयने विनंती केल्यानंतर श्रीलंकेनं मलिंगाला आयपीएल खेळायला परवानगी दिली. बंगळुरुविरुद्धच्या मॅचसाठी मलिंगा उपलब्ध असेल.

मुंबई आणि बंगळुरुमध्ये आज (गुरुवार) मॅच खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा दिल्लीने ३७ रननी पराभव केला होता.