अबू धाबी : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडीयन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामान्यात राजस्थानने बेन स्टोक्सच्या मदतीने आठ विकेट्सनी विजय मिळवलाय. दरम्यान रोहीत शर्माच्या जागी कॅप्टन्सी करणाऱ्या कायरन पोलार्डने मुंबई इंडीयन्सच्या हरण्यामागचं कारण सांगितलंय.
या मॅचमध्ये मुंबईने राजस्थानसमोर १९६ रन्सचे आव्हान दिले होते. मुंबई इंडीयन्सची बॉलिंग साईड पाहता ते राजस्थानला रोखू शकतात हेच दिसत होतं. पण स्टोक्सच्या नाबाद १०७ आणि संजू सॅमसनच्या नाबाद ५४ रन्सच्या दमदार खेळीमुळे राजस्थानने हा सामना आठ विकेट्सनी जिंकला.
मुंबईचा मोठा स्कोअर उभा राहण्याचे श्रेय हार्दीक पांड्याच्या नाबाद २१ बॉल्समध्ये ६० रन्सच्या खेळाला जातं. पण त्याची ही खेळी टीमला विजयापर्यंत पोहोचवू शकली नाही.
आम्हाला वाटलं हार्दीकने आम्हाला मॅच आणून दिली आहे. पण स्टोक्सने खूप छान खेळ केला. सॅमसनने देखील त्याला चांगली साथ दिली. आमच्या विरोधी टीमने चांगला खेळ केला असे कायरन पोलार्डने सांगितले.
यामुळे आमच्या परफॉर्मन्सवर जास्त परिणाम नाही होणार. आमच्याकडे आणखी ३ मॅच आहेत. आम्हाला चांगला खेळ करायचा आहे. आमच्या बॉलर्सनी चांगला प्रयत्न केला पण आज आमचा दिवस नव्हता असे पोलार्ड म्हणाला.
ही मॅच जिंकली असती तर मुंबई इंडीयन्स प्ले ऑफमध्ये पोहोचली असती. पण आता टीमला आणखी वाट पाहावी लागणार आहे.