GT vs RR IPL Final : लाल मातीच्या खेळपट्टीवर फायनलचा थरार रंगणार?

अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. 

Updated: May 29, 2022, 04:19 PM IST
GT vs RR IPL Final : लाल मातीच्या खेळपट्टीवर फायनलचा थरार रंगणार? title=

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) महामुकाबला आज पार पडणार आहे. या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे हा अंतिम सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. (ipl 2022 final gt vs rr gujrat titans and rajsthan royals megafinal match may be played in red clay pitch)

कोणत्या खेळपट्टीवर होणार सामना?

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकूण 11 खेळपट्ट्या आहेत. या 11 पैकी 6 खेळपट्ट्या या काळ्या मातीच्या आहेत. तर 5 खेळपट्ट्या या लाल मातीच्या आहेत. सूत्रांनुसार, हा महाअंतिम सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर होऊ शकतो. जर असं झालं, तर फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून विकेट्स घेण्यात मदत मिळेल. तर काळ्या मातीच्या खेळपट्टीवर सामना झाल्यास वेगवान गोलंदाजांना उसळी मिळेल.

एकूण पाहिलं तर, सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. नरेंद्र मोदी स्टेडियम फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचं म्हटलं जातं.

पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने 180-190 धावसंख्या केल्यास त्यांना विजयाची शक्यता असते. मात्र दवामुळे विजयी आव्हानाचं पाठलाग करणाऱ्या टीमलाही फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

नरेंद्र मोदी स्टेडियम सध्या गुजरात टीमचा होमग्राउंड आहे. याआधी 2010, 14 आणि 15 साली राजस्थान टीमचा हा होम ग्राउंड होता. त्यामुळे आता प्रेक्षकांचा पाठिंबा हा गुजरातला असणार की राजस्थानला याकडे हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

राजस्थान रॉयल्सची टीम :  संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडीक्कल, करुण नायर, ध्रुव जुरेल, आर. वेन डेर डुसेन, रवीचंद्रन अश्विन, रियान पराग, अनुनय सिंह, शुभम गढवाल, जिमी निशाम, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, नवदीप सैनी, ओबेड मॅकॉय, कुलदीप सेन, तेजस बरोका, कुलदीप यादव, नाथन कूल्टर-नाइल आणि डेरिल मिचेल. 

गुजरात  टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, रहमानुल्लाह गुरबाज, अभिनव सदरंगानी, डेविड मिलर, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, डोमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नालकंडे, गुरकीरत सिंह मान, साई सुदर्शन, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन, नूर अहमद, आर साई किशोर, यश दयाल, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान आणि वरुण आरोन.