IPL 2022 : आयपीएलचा 15वा सीझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. IPL 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी रंगणार आहे. सामन्यांचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. मात्र, आता याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अहवालानुसार, स्पर्धेचा पहिला सामना गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीत खेळलेल्या दोन संघांमध्ये म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. (IPL 2022 First match Update)
IPL 2021 च्या अंतिम सामन्यांमध्ये खेळलेले संघ IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात आमने-सामने येणार आहेत. अंतिम सामन्यात चेन्नईने कोलकात्याचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. मात्र, यंदा संघांची संख्या वाढल्याने या मेगा लीगचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. IPL 2022 मध्ये 8 नाही तर यंदा 10 संघ खेळताना दिसणार आहेत.
यंदा सर्व संघांची 2 वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. संघांची संख्या वाढल्यामुळे यंदा सामन्यांची संख्याही वाढली आहे. या वर्षापासून एकूण 70 लीग सामने खेळवले जाणार आहेत.
लीगचे सर्व सामने महाराष्ट्रात
कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता, आयपीएल (IPL 2022) च्या 15 व्या हंगामातील लीग टप्पा मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये मुंबईच्या 3 आणि पुण्याच्या 1 स्टेडियमची नावे देण्यात आली आहेत. 55 सामने मुंबईच्या वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील स्टेडियमवर, तर 15 सामने पुण्यात होणार आहेत.
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट दिली. त्यांनी आयपीएलच्या संबंधित तयारीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत बीसीसीआयचे अनेक बडे अधिकारीही उपस्थित होते.