IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या मिशन 'आयपीएल'ला मोठा धक्का, 8 कोटींचा प्रमुख गोलंदाज पडला बाहेर

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी सामना रंगणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला आता पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. पण त्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे. 

राजीव कासले | Updated: May 9, 2023, 02:02 PM IST
IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या मिशन 'आयपीएल'ला मोठा धक्का, 8 कोटींचा प्रमुख गोलंदाज पडला बाहेर title=

IPL 2023 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या मिशन आयपीएलला (IPL 2023) मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी आधीच कमकुवत असताना आता टीमचा प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. 2022 मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने या गोलंदाजावर तब्बल 8 कोटींची बोली लावत संघात घेतलं. पण आयपीएलच्या अर्ध्यावरतीच हा गोलंदाज मायदेशी परतणार आहे. मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतग्रस्त झाला असून त्याच्या जागी क्रिस जॉर्डनचा (Chris Jorden) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात समावेश करण्यात आला आहे. जोफ्रा आर्चरसाठी आयीएलचा हा हंगाम अतिशय निराशाजनक ठरला आहे. 

जोफ्रा आर्चरची खराब कामगिरी
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्ससाठी 5 सामने खेळला आहे. यात त्याला केवळ 2 विकेट घेता आल्यात. याआधीच्या म्हणजे 2022 च्या हंगामात जोफ्रा मुंबईसाठी एकही सामना खेळला नव्हता. जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त आहे. त्याच्या फिटनेसवर (Fitness) इंग्लंड आणि वेल्सक्रिकेट बोर्डाकडून सातत्याने अपडेट घेतली जात आहे. आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर जोफ्रा मायदेश परतणार आहे. या ठिकाणी त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. 

क्रिस जॉर्डनचा समावेश
जोफ्राच्या जागी क्रिस जॉर्डनचा मुंबई इंडियन्सचा समावेश करण्यात आला आहे.  34 वर्षांचा जॉर्डन आयपीएलमध्ये एकुण 28 सामने खेळला आहे. यात त्याने 27 विकेट घेतल्या आहेत. बारबाडोसमध्ये जन्मलेल्या क्रिस जॉर्डनने इंग्लंड संघाकडून खेळताना 8 कसोटी, 35 एकदिवसीय, 86 टी20 खेळला आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात क्रिस जॉर्डनची ब्रेस प्राईज 2 कोटी रुपये होती. पण त्याच्यावर कोणी बोली लावली नव्हती. जॉर्डन याआधी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. 

मुंबई इंडियन्सचा प्रवास
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत 10 सामने खेळला आहे. यात पाच सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. पॉईंटटेबलमध्ये मुंबई इंडियन्स आठव्या स्थानावर आहे. आज म्हणजे 9 मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्सच्या बंगलोरबरोबर खेळवला जाणार आहे. बंगलोर पॉईंटटेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. मुंबई वि. बंगलोर सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

प्ले ऑफमध्ये जागा बनवण्यासाठी मुंबईला आता पुढचे चारही सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबई संघाचा आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबादबरोबर सामने बाकी आहेत. मुंबईचा शेवटाच सामना 21 मे रोजी वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.