पाऊस पडला तर कोणत्या संघाचं नुकसान? RCB आणि CSK साठी असं आहे प्लेऑफचं समीकरण

RCB vs CSK Weather Update: बंगळुरुच्या केएम चिन्नास्वामी स्टेडिअमवर 18 मे रोजी होणाऱ्या आयपीएलच्या 68 व्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 मे दरम्यान दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण यामुळे बंगळुरु आणि चेन्नईची धाकधुक वाढली आहे.

राजीव कासले | Updated: May 17, 2024, 04:50 PM IST
पाऊस पडला तर कोणत्या संघाचं नुकसान?  RCB आणि CSK साठी असं आहे प्लेऑफचं समीकरण title=

IPL 2024 RCB vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगचा सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्ले ऑफच्या (IPL Play Off) टॉप फोर पैकी तीन संघ निश्चित झाले आहेत. तर एका जागेसाठी दोन संघांमध्ये चुरस आहे. यासाठी चेन्नी सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आमने सामने आहेत.  शनिवारी म्हणजे 18 मे रोजी के एम चिन्नास्वामी स्टेडिमवर  प्ले ऑफमधला चौथा ठरणार आहे. सध्या तरी चेन्नई सुपर किंग्सचं पारडं जड आहे. चेन्नईच्या खात्यात 14 पॉईंट जमा आहेत. तर बंगळुरुच्या खात्यात 12 पॉईंट्स आहेत. प्ले ऑफमध्ये दाखल होण्यासाठी चेन्नईला केवळ एका विजयाची गरज आहे. तर बंगळुरुला केवळ विजय मिळवून चालणार नाही तर चेन्नईवर मोठ्या फरकाने मात करावी लागणार आहे. बंगळुरु नेट रनरेट राखण्यात अपयशी ठरली तर पराभवानंतरही चेन्नईसाठी प्ले ऑफचा मार्ग मोकळा होईल.

पाऊस बिघडवणार आरसीबीचा गेम
प्ले ऑफ गाठण्यासाठी बंगळुरुला चेन्नईवर कमीत कमी 18 धावांच्या अंतराने किंवा 11 चेंडू राखून मात करावी लागणार आहे. यामुळे बंगळुरुचा रनरेट चेन्नईपेक्षा चांगला होईल. बंगळुरुचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या सलग पाच सामन्यात बंगळुरुने विजय मिळवलाय. पण आता गाठ पाचवेळा जेतेपद पटकावलेल्या चेन्नईशी आहे. बंगळुरुसमोर आणखी एक मोठी समस्या म्हणजे पाऊस. भारतीय हवामान विभागाने दक्षिण कर्नाटकमध्ये 18 ते 20 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. 

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आणि पाऊस पडला तर सामना रद्द होऊ शकतो किंवा षटक कमी केली जाऊ शकतात. अशात बंगळुरु आणि चेन्नईपैकी कोणत्या संघाला फटका बसणार हा प्रश्न आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर चेन्नईला फायदाच होणार आहे. दोन्ही संघांना 1-1 पॉईंट दिला जाईल. ज्यामुळे चेन्नईचे 15 पॉईंट होतील आणि त्यांचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा होईल. तर बंगळुरुला न खेळताचा बाहेर पडावं लागेल.

षटकं कमी झाल्यास काय?
पावसामुळे षटकं कमी झाल्यास बंगळुरुला सामना जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. पू्र्ण 20 षटकांचा सामना झाला आणि बंगळुरुने पहिली फलंदाजी करताना 200 धावा केल्या तर त्यांना चेन्नईला 182 धावात रोखावं लागणार आहे. म्हणजे चेन्नईला 18 धावांनी पराभूत करावलं लागेल. चेन्नईने पहिली फलंदाजी करताना 200 धावा केल्या. तर विजयाचं हे आव्हान बंगळुरुला 11 चेंडू आधी म्हणजे 18.1 षटकात पार करावं लागणार आहे. यामुळे त्यांचा रनरेट चेन्नईपेक्षा वरचढ होईल. पावसामुळे षटकं कमी केली तरी बंगळुरुला विजयासाठी हेच समीकरण असेल. म्हणजे...

- सामना 15-15 षटकांचा खेळवण्यात आला आणि बंगळुरुने पहिली फलंदाजी करताना 170 धावा केल्या तर त्यांना चेन्नईला 152 धावात रोखावं लागणार आहे. चेन्नईने पहिली फलंदाजी करताना 170 धावा केल्यात तर हे आव्हान बंगळुरुला 13.1 षटकात पूर्ण करावं लागेल

- सामना प्रत्येकी 10 षटकांचा झाला आणि बंगळुरुने पहिली फलंदाजी करताना 100 धावा केल्या तर चेन्नईला 82 धावात रोखावं लागेल. चेन्नईने पहिली फलंदाजी केली आणि 100 धावा केल्या तर बंगळुरुला हे आव्हान 8.1 षटकात पूर्ण करावं लागेल. 

- सामना 5-5 षटकांचा झाला आणि बंगळुरुने पहिली फलंदाजी करत 50 धावा केल्या तर चेन्नईला 32 धावांत रोखावं लागेल. चेन्नईने पहिली फलंदाजी करत 50 धावा केल्या तर बंगळुरुला 3.1 षटकात 5.1 धावा पूर्ण कराव्या लागतील.