IPL Auction : पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातला दुसरा महाग खेळाडू

आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठी कोलकात्यामध्ये लिलाव पार पडला.

Updated: Dec 19, 2019, 10:14 PM IST
IPL Auction : पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातला दुसरा महाग खेळाडू title=

कोलकाता : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठी कोलकात्यामध्ये लिलाव पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लागल्या. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सने या लिलावात इतिहास घडवला. पॅट कमिन्सला कोलकात्याने १५.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातला दुसरा सगळ्यात महाग खेळाडू आणि सगळ्यात महाग परदेशी खेळाडू ठरला.

युवराज सिंग हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू आहे. २०१५ साली दिल्लीने युवराजला १६ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. पण दिल्लीला याचा फायदा झाला नाही. युवराजने १४ मॅचमध्ये फक्त २४८ रन केले. त्या मोसमात दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर राहिली.

आयपीएलचा लिलाव : हे खेळाडू झाले मालामाल

२०१७ साली पुण्याने बेन स्टोक्सला १४.५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. स्टोक्सने त्याला मिळालेल्या पैशांना साजेसा खेळ केला. १२ मॅचमध्ये त्याने ३१६ रन केले, यामध्ये १५ सिक्सचा समावेश होता. तसंच त्याने १२ मॅचमध्ये १२ विकेटही घेतल्या.

२०१४ साली बंगळुरुने युवराजसाठी १४ कोटी रुपये मोजले होते. या मोसमात युवराजने ३७६ रन केले, ज्यात २८ सिक्सचा समावेश होता. युवराजच्या चांगल्या फॉर्मचा बंगळुरुला फायदा झाला नाही. बंगळुरु पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर राहिली.

२०१४ साली दिल्लीने दिनेश कार्तिकला १२.५ कोटी रुपयांना विकत घेतलं. त्या मोसमात कार्तिकने ३२५ रन केले. पण दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली.

२०१८ साली राजस्थानने बेन स्टोक्सवर १२.५ कोटी रुपये खर्च केले. पण मागच्यावेळेप्रमाणे यंदा मात्र बेन स्टोक्सला संघर्ष करावा लागला. १३ मॅचमध्ये स्टोक्सने १२१.७३ च्या स्ट्राईक रेटने १९६ रन केले. २०१८ च्या मोसमात स्टोक्सला ८ विकेटच घेता आल्या.