मुंबई : IPL 2022 मध्ये आज 29 मे गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये फायनल सामना रंगणार आहे. हा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल. या सामन्यपूर्वी आम्ही तुम्हाला दोन्ही संघातील या 5 खेळाडूंची नावे सांगणार आहोत, जे कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतात.
जोस बटलर
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या टॉपवर असलेला राजस्थानचा जॉस बटलर हा जर मैदानात टीकला तर सामन्याचा निकाल बदलू शकतो. बटलरने या आयपीएलमध्ये आतापर्यंत 800 हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 4 शतके झळकावली आहेत. सध्या तो तुफान फॉर्ममध्ये आहे. अंतिम सामन्यात जर बटलर मैदानावर टीकला तर गुजरात विरूद्ध चांगला स्कोरबोर्ड उभारू शकतो, तर चांगला स्कोरबोर्ड चेसही करू शकतो.
युझवेंद्र चहल
राजस्थान संघात चांगल्या गोलंदाजांचा भरणा आहे. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय हे चौघेही चांगले गोलंदाज आहेत. पण चहल असा लेग-स्पिनर आहे जो कोणत्याही क्षणी विकेट घेऊन सामना फिरवू शकतो. या मोसमात चहलने आतापर्यंत २६ बळी घेतले आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. चहलनेही 1-1 वेळा पाच आणि चार विकेट घेतल्या आहेत.
डेव्हिड मिलर
गुजरात संघातला मिडल ऑर्डर फलंदाज डेव्हिड मिलर एक उत्तम गेम चेंजर आहे.मिलरने क्वालिफायर-1 हा शेवटचा सामना खेळला, ज्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाला सलग तीन षटकार मारून सामना जिंकवला. मिलरने 38 चेंडूत 68 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 षटकार मारले. मिलरने या हंगामात संघासाठी 15 सामन्यांमध्ये सर्वाधिक 449 धावा केल्या आहेत.
राहुल तेवतिया
गुजरातचा ऑलराऊंडर राहुल तेवतिया हा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो बॉलिंगसह बॅटनेही अप्रतिम कामगिरी करताना दिसला आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तेवतियाने अनेक गुजरातला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. आरसीबीविरुद्ध 25 चेंडूत नाबाद 43 आणि हैदराबादविरुद्ध 21 चेंडूत नाबाद 40 धावा खेळून त्यांनी सामन्याचा निकाल बदलून स्वबळावर संघाला विजय मिळवून दिला होता.
प्रसिद्ध कृष्णा
राजस्थान संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाही या हंगामात गोलंदाजीने धुमाकूळ घालतोय. त्याने अनेक सामन्यात विकेटस घेऊन राजस्थानला विजय मिळवून दिलाय. क्वालिफायर-2 सामन्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 22 धावांत 3 बळी घेतले आणि संघाला विजय मिळवून दिला. यापूर्वी लखनऊ विरुद्ध सामन्यात २ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला होता.
दरम्यान या दोन्ही संघातले हे पाच खेळाडू कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलू शकतात. त्यामुळे आता हे खेळाडू नेमके कसा परफॉर्मन्स देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.