IPL MEGA AUCTION 2022 : मुंबईकर श्रेयस अय्यरला लागला जॅकपॉट, या संघाने लावली सर्वाधिक बोली

आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी श्रेयस अय्यरवर करोडींची बोली, कर्णधारपदही मिळू शकतं

Updated: Feb 12, 2022, 01:24 PM IST
IPL MEGA AUCTION 2022 : मुंबईकर श्रेयस अय्यरला लागला जॅकपॉट, या संघाने लावली सर्वाधिक बोली title=

IPL MEGA AUCTION 2022 : मार्च आणि एप्रिलमध्ये खेळल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामासाठीचा मेगा लिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू इथं होणार आहे. या लिलावात 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यात 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 

श्रेयस अय्यरला जॅकपॉट
आयपीएल मेगा ऑक्शनच्या  (IPL 2022) पहिल्याच दिवशी मुंबईकर श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) सर्वाधिक बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) श्रेयस अय्यरवर तब्बल 12.25 कोटींची बोली लावत आपल्या संघात सहभागी करुन घेतलं. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाच्या भूमिकेतही दिसू शकतो. याआधी श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधीरपद भूषवलं आहे.

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडे सर्वच फ्रँचाईजीच्या नजरा लागल्या होत्या. त्याची बोली दोन कोटींपासून सुरू झाली. दिल्ली, बंगळुरू, कोलकाता यांनी सुरुवातीला श्रेयस अय्यरसाठी जोरदार बोली लावली. पण यात केकेआरने बाजी मारली. कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला 12.25 कोटींना विकत घेतलं. केकेआरने श्रेयस अय्यरला कर्णधारपद दिल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्मात
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत गाठली होती. आयपीएल 2021 हंगामात श्रेयस स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी झाला. त्याने आठ सामन्यांमध्ये 175 रन्स केले. मेगा ऑक्शनपूर्वी श्रेयसने वेस्ट इंडिजविरुद्ध 80 रन्स केले आणि त्याचा फायदा त्याला लिलावातही मिळाला. 

पंतमुळे श्रेयसच्या कर्णधारपदावर गदा
श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. त्याने 2020 मध्ये संघाला अंतिम फेरीतही नेले. पण 2021 च्या मोसमापूर्वी तो जखमी झाला होता. यानंतर संघाने ऋषभ पंतला कर्णधार बनवले. पण या निर्णयामुळे अय्यरने संघ सोडण्याचा निर्णय घेतला

कोलकाताच्या कर्णधारपदी लागणार वर्णी?
श्रेयस अय्यरची कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी वर्णी लागू शकते. गेल्या हंगामात केकेआरची धुरा इयॉन मॉर्गनच्या हातात होती. मात्र संघाने त्याला संघात कायम ठेवलं नाही. केकेआरचा संघ 2014 पासून आयपीएलचं विजेतेपद मिळवू शकलेला नाही. अशा परिस्थितीत संघ यावेळी बांधणी करत आहे.