कोलकाता : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येक टीम जोरदार तयारी करत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी वर्ल्ड कप जिंकण्यासाठीच्या दावेदार टीमही सांगितल्या आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिस याच्यामते मात्र वर्ल्ड कप जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार टीम सांगणं कठीण आहे. 'हा वर्ल्ड कप पूर्णपणे खुला आहे. कोणतीही एक टीम वर्ल्ड कप जिंकण्याची दावेदार नाही. वर्ल्ड कपच्या फॉरमॅटमुळे यंदाची स्पर्धा रोचक झाली आहे.'
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक टीम दुसऱ्या टीमविरुद्ध एक मॅच खेळणार आहे. यानंतर टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये जातील. १९९२ नंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कपसाठी हा फॉरमॅट असणार आहे.
वर्ल्ड कप जिंकण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या शक्यतेवरही कॅलिसला विचारण्यात आलं. तेव्हा, 'पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेची टीम वर्ल्ड कप जिंकण्याची कमी शक्यता घेऊन मैदानात उतरेल. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला दावेदार मानलं जात नाही. ही चांगली गोष्ट आहे. यामुळे दबाव येत नाही, तसंच टीमला योग्य वेळी चांगलं क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य मिळतं. पण दक्षिण आफ्रिकेच्या टीमला तुम्ही वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदारीतून बाहेर काढू शकत नाही', असं वक्तव्य कॅलिसने केलं.
जगाने पाहिलेला सर्वोत्तम ऑल राऊंडर अशी ख्याती असलेला जॅक कॅलिस हा सध्या आयपीएलमध्ये कोलकात्याच्या टीमचा प्रशिक्षक आहे. याआधी कॅलिस कोलकात्याकडून खेळायचा, तेव्हा कोलकात्याने दोनवेळा आयपीएल जिंकली होती. यंदाच्या वर्षी २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.