मुंबई : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महिला जयवर्धने टीम इंडियाचा नवा कोच होईल अशा चर्चा सुरु होत्या. या सगळ्या चर्चांवर खुद्द महिला जयवर्धनेनंच प्रतिक्रिया दिली आहे. पूर्णवेळ कोच व्हायचा सध्या तरी माझा विचार नाही. आता मी मुंबई इंडियन्स आणि खुलना टीमचा कोच आहे आणि या टीमच्या कोचिंगवर माझं पूर्ण लक्ष असल्याचं ट्विट जयवर्धनेनं केलं आहे.
Flattered by speculation linking me to India coaching job but I am not looking at full-time positions right now.
— Mahela Jayawardena (@MahelaJay) June 26, 2017
I am completely focused on current commitments with MI and Khulna.
— Mahela Jayawardena (@MahelaJay) June 26, 2017
विराट कोहलीबरोबर वाद झाल्यामुळे कोच अनिल कुंबळेनं राजीनामा दिला. यानंतर टीम इंडियाचा कोच कोण होणार याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये चार भारतीय तर दोन परदेशी खेळाडू आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि गगन खोडा यांनी अर्ज केले आहेत.
परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर आणि आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबादचे कोच टॉम मूडी तसंच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रिचर्ड पायबस यांनीही बीसीसीआयकडे अर्ज केला आहे. या पाच इच्छुकांची सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती मुलाखत घेईल आणि त्यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड होईल.