मुंबई : इंग्लंडचा क्रिकेटपटू जॉस बटलर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये बटलरनं शानदार कामगिरी केली. या सीरिजमध्ये बटलरनं शतकही लगावलं. आयपीएलमध्येही बटलरनं अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. या प्रदर्शनामुळे बटलरची पाकिस्तानविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड झाली. दोन्ही टेस्टमध्ये बटलरनं त्याची निवड योग्य ठरवली. पहिल्या टेस्टमध्ये बटलरनं ६७ रन बनवले तर दुसऱ्या टेस्टमध्ये त्यानं सर्वाधिक नाबाद ८० रनची खेळी केली. बटलरची बॅट तळपत असली तरी याच बॅटमुळे तो अडचणीत आला आहे. बॅटवर लिहिलेल्या शिवीमुळे बटलरवर टीकेची झोड उठली आहे. बटलरच्या बॅटच्या दांड्यावर ही शिवी लिहिण्यात आली आहे. बटलरनं याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Jos Buttler. Hero. pic.twitter.com/Bk4Z5pAeIW
— England's Barmy Army (@TheBarmyArmy) June 3, 2018
शिवी लिहिलेली बॅट वापरल्यामुळे जॉस बटलर सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होत आहे. क्रिकेटसारख्या जंटलमन्सच्या खेळात अशाप्रकारची बॅट वापरणं चुकीचं आहे. लॉर्ड्ससारख्या ऐतिहासिक मैदानात अशी बॅट वापरणं शरमेची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंगवर उमटत आहेत.
आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना जॉस बटलरनं सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी केली होती. बटलरनं या आयपीएलमध्ये लागोपाठ पाच अर्धशतकं केली होती. आयपीएलमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. भारतामध्ये एवढ्या प्रेक्षकांच्या समोर खेळताना दबाव असतो. या दबावामुळे आपण कुठे आहोत आणि कुठे जाऊ शकतो हे तुम्हाला कळतं, असं बटलर म्हणाला.