न्यूझीलंडमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाला शेवटचा इशारा, अन्यथा माघारी पाठवणार

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला न्यूझीलंड सरकारचा शेवटचा इशारा

Updated: Nov 27, 2020, 06:30 PM IST
न्यूझीलंडमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाला शेवटचा इशारा, अन्यथा माघारी पाठवणार title=

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी न्यूझीलंड दौर्‍यावर आलेल्या पाकिस्तान संघाबद्दल मोठा खुलासा केला आहे. न्यूझीलंड सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला कोविड 19 संबंधित नियमांचे पालन करण्याबाबत शेवटचा इशारा दिला असल्याचे वसीम खान यांनी सांगितले आहे. पाकिस्तानच्या सहा खेळाडूंची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.

पीसीबीचे अधिकारी वसीम खान म्हणाले की, पीसीबीला पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून तीन ते चार वेळा एसओपीचे उल्लंघन केल्याची माहिती मिळाली आहे. क्रिकइन्फोच्या मते, वसीम खानने संघातील खेळाडूंना सांगितले आहे की, "मी न्यूझीलंड सरकारशी बोललो आहे. तीन-चार प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यांचे शून्य सहिष्णुता धोरण आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला शेवटचा इशारा दिला आहे.'

याविषयी ते पुढे म्हणाले, "हे सोपे नाही, परंतु देशाच्या आदराचा प्रश्न आहे. 14 दिवस तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे की जर आणखी काही उल्लंघन झाले तर तुम्हाला परत पाकिस्तानात पाठवलं जाईल.' त्याचबरोबर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने असे म्हटले आहे की, आता पाकिस्तानचे खेळाडू चांगले वर्तन करीत आहेत, परंतु यापूर्वी गुरुवारी NZc  ने म्हटले होते की, 'पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांचे सहा खेळाडू कोविड पॉझिटिव्ह असल्याचेही आढळले आहे.'

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या दौर्‍यावर आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये टी-20 आणि टेस्ट सिरीज होणार आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाबाबतचे नियम बरेच कठोर आहेत.