धोनीची नवी इनिंग; पत्नीनं दिली Good News

क्रिकेटचं मैदान गाजवणारा धोनी आता....

Updated: Oct 1, 2020, 06:54 PM IST
धोनीची नवी इनिंग; पत्नीनं दिली Good News
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतीय क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवणाऱ्या आणि काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणारा महेंद्रसिंह धोनी या त्याच्या व्यक्तीमत्वासाठीसुद्धा ओळखला जातो. एक खेळाडू म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही तो खऱ्या अर्थानं अनेकांसाठी सुपरहिरो आहे. असा हा धोनी आता एका नव्या इनिंगसाठी आणि नव्या विश्वात वेगळ्या कारकिर्दीसाठी सज्ज झाला आहे. माहीची पत्नी साक्षी हिनं याबाबतची आनंदाची बातमी दिली. 

आता माहीची ही नवी इनिंग आहे तरी काय, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर, उत्तरार्थी तुमच्या मनात आणखी कोणत्या गोष्टी घर करण्यापूर्वीच याचा उलगडा इथं होत आहे. कारण, क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आता मनोरंजन जगतात पदार्पण करत आहे. एका वेब सीरिजच्या निर्मितीच्या निमित्तानं धोनी आणि त्याची पत्नी दोघंही ही नवी जबाबदारी पार पाडणार आहेत. 

धोनी एंटरटेन्मेंट या बॅऩरअंतर्गत त्यांनी २०१९ मध्ये 'द रोअर ऑफ द लायन'ची निर्मिती केली होती. आता एका नवख्या लेखकाच्या अप्रकाशित पुस्तकावर आधारित वेब सीरिजच्या निर्मितीसाठी ते पुढं सरसावल्याचं कळत आहे. 

 

साक्षीनं या बाबतची माहिती देत मध्ये 'द रोअर ऑफ द लायन'च्या वेळीच मनोरंजन जगतात पदार्पण करण्याची ही योग्य वेळ असल्याचा आपण विचार केल्याचं तिनं सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही साक्षीनं ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवत तिनं चाहत्यांचं प्रेम आणि सदिच्छांचीच आपल्याला गरज असल्याचं म्हटलं. आता साक्षीनं दिलेली ही आनंदाची बातमी आणि माहीची नवी इनिंग पाहता चाहत्यांचं, क्रीडारसिकांचं प्रेम त्याला मिळणार, यात शंका नाही.