क्वालालंपूर : मलेशियन ओपन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या कॅरोलिन मारीनला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह सिंधूने मलेशियन ओपनच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत तिला चायनिज तैपेइच्या ताय झु यिंगचा सामना करावा लागणार आहे.
सिंधूने सुरुवातीपासून चांगला खेळ करत मारीनचा खेळ खल्लास केला. दमदार स्मॅश आणि नेट जवळील परफेक्ट प्लेसिंगचा खेळ करत सिंधूने मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील ही लढत २२-२०, २१-१९ अशा सरळ दोन सेटमध्ये जिंकली. या विजयामुळे सिंधूने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंधूसह श्रीकांत किदम्बीनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, सायना नेहवालच्या पराभवाने सिंधूवर भारताचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राखण्याची मदार होती. मात्र, उपांत्य फेरीच्या तिच्या मार्गात स्पेनच्या मारीनचा अडथळा होता. उपांत्यपूर्व फेरीच्या या चुरशीच्या लढतीत सिंधूने कडवी झुंज देताना मारीनवर विजय मिळवला. या विजयासह सिंधूने रिओतील पराभवाची परतफेड केली.