नवी दिल्ली : वय चोरीचं आणखी एक प्रकरण भारतीय क्रिकेटमध्ये समोर आलं आहे. वय चोरल्याप्रकरणी भारताला अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या मनजोत कालराचं २ वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दिल्ली डिसट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मनोजत कारलावर ही कारवाई केली आहे. २०१८ साली झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप फायनलमध्ये मनजोत कारलाने शतक केलं होतं. या शतकामुळे मनजोतला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं.
मनजोत कालराने खोटं वय सांगितल्याप्रकरणी त्याच्यावर डीडीसीएच्या लोकपालनी कारवाई केली आहे. मनजोतशिवाय लोकपालनी आयपीएलच्या कोलकात्याच्या टीमच्या २ खेळाडूंच्या वयाबाबतही संशय व्यक्त केला आहे. यामध्ये शिवम मावी आणि नितीश राणा यांचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंच्या वयाचं प्रकरण डीडीसीएने बीसीसीआयकडे पाठवलं आहे.
याचवर्षी जून महिन्यात दिल्ली पोलिसांच्या एका विशेष चौकशी समितीने मनजोत कालराच्या आई-वडिलांविरोधात चार्जशीट दाखल केली होती. मनजोत कालराला ज्युनियर क्रिकेट खेळता यावं यासाठी त्याच्या आई-वडिलांनी मनजोतची जन्म तारीख १५ जानेवारी १९९९ सांगितली. पण मनजोतची जन्म तारीख १५ जानेवारी १९९८ होती. त्यावेळी मनजोत कारला अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती.
दुसरीकडे शिवम मावीदेखील वय चोरीप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे शिवम मावीवर देखील निलंबनाची टांगती तलवार आहे. मनजोतप्रमाणेच शिवम मावीदेखील अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा भाग होता.
नितीश राणाला त्याच्या जन्म तारखेविषयीचे कागदपत्र जमा करायला सांगण्यात आलं आहे. जर नितीश राणाने दिलेली माहिती चुकीची आढळली तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकते. नितीश राणा आणि शिवम मावीवर कारवाई झाली तर मात्र आयपीएलमध्ये कोलकात्याच्या टीमला मोठा धक्का लागू शकतो.
याआधी २०१५ साली वयाची चोरी केल्याप्रकरणी २२ खेळाडूंचं निलंबन झालं होतं, त्यामध्ये नितीश राणाचंही नाव होतं. नितीश राणा हा आता २६ वर्षांचा आहे. या वयात तो वयोमर्यादा असलेली स्पर्धा खेळू शकत नाही, त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.