सिडनी : मेलबर्नमधील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. चौथा कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या हेतूने आज भारतीय संघ मैदानात उतरला. आजपासून (गुरुवार) सिडनीत चौथ्या कसोटीला सुरुवात झाली. कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावे राहिला. असं म्हटल्यास वावगे ठरु नये. भारताची सुरुवात इतकी चांगली झाली नसली तरी नंतर फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे दिवसअखेर भारताची धावसंख्या ही ४ बाद ३०३ इतकी आहे. पुजाराचं शतक आणि मयांक अग्रवालच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने ३०३ रन्सचा आकडा गाठला. हनुमा विहारी ३९ धावांसह सध्या नाबाद आहे.
नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहूलने पुन्हा एकदा प्रेक्षकांची घोर निराशा केली. तो फक्त ९ धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या पुजाराने सलामीवीर मयंक अग्रवालच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावा जोडल्या. या भागीदारीमुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकली.
या मालिकेत पुजाराने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ४५८ धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धात सर्वात जास्त बॉल खेळणाऱ्या भारतीयांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. या यादीत राहुल द्रविड, सुनील गावस्कर, विजय हजारे आणि कोहलीचा समावेश आहे. पुजाराने या मालिकेत ११३५ चेंडूंचा सामना केला आहे.
मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या सिडनी आणि मेलबर्न कसोटी सामन्यात एक समान गोष्ट घडली. मेलबर्न कसोटीत मयंकने ७६ धावा केल्या होत्या. तर सिडनी कसोटीत त्याने ७७ धावा केल्या. तर पुजाराने देखील मेलबर्न कसोटीत १०६ धावा केल्या होत्या. तसेच आता सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत तो १३० धावांवर नाबाद आहे.