World Cup 2019: भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्काराची मागणी, पण तिकीटासाठी ४ लाख अर्ज

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.

Updated: Feb 21, 2019, 04:29 PM IST
World Cup 2019: भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्काराची मागणी, पण तिकीटासाठी ४ लाख अर्ज title=

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धची मागणी जोर धरू लागली आहे. काही माजी क्रिकेटपटू आणि प्रशासकांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. पण मॅन्चेस्टरमध्ये १६ जूनला होणाऱ्या या मॅचच्या तिकिटासाठी ४ लाख अर्ज आले आहेत. मुख्य म्हणजे मॅन्चेस्टरच्या या स्टेडियमची क्षमता २५ हजार एवढीच आहे.

हरभजन आणि सौरव गांगुली यांच्यासारख्या भारताच्या माजी दिग्गज खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली आहे. एवढच नाही तर पाकिस्तानची क्रिकेटमधून हकालपट्टी करण्यासाठी बीसीसीआयनं पावलं उचलली आहेत. याबद्दल आयसीसीला पत्र लिहिण्याचे आदेश प्रशासकिय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना दिले आहेत. पण क्रिकेट रसिकांनी मात्र या मॅचच्या तिकिटासाठी मोठी मागणी केली आहे.

आयसीसी वर्ल्ड कपचे संचालक स्टिव्ह एलवर्थी यांनी लंडनमध्ये झालेल्या एका प्रचार कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानच्या मॅचमधल्या तिकीट विक्रीवर भाष्य केलं. भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचसाठी असलेली तिकिटाची मागणी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया आणि लॉर्ड्सवर होणाऱ्या वर्ल्ड कप फायनलपेक्षा जास्त असल्याचं एलवर्थी यांनी सांगितलं.

इएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या बातमीनुसार एलवर्थी म्हणाले 'भारत-पाकिस्तान मॅचच्या तिकीटांसाठी ४ लाखांहून अधिक जणांनी अर्ज केले आहे. पण या स्टेडियममध्ये २५ हजार दर्शकच बसू शकतात. यामुळे अनेकजण निराश झाले आहेत. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मॅचसाठी २,३०,००० ते २,४०,००० अर्ज आलेत, तर फायनलसाठी २,६०,००० ते २,७०,००० अर्ज आलेत.'