भारताविरुद्ध 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये तसेच सीएसके टीमकडून आयपीएलमध्ये खेळणारा क्रिकेटर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. धोनीच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये खेळलेल्या या श्रीलंकेच्या क्रिकेटरचे नाव सूरज रणदीव असून त्याने 2012 मध्ये सीएसकेकडून 8 सामन्यात खेळताना 6 विकेट्स घेतल्या होत्या.
देशाच्या टीमकडून खेळल्यावर क्रिकेटर्सना चांगली प्रसिद्धी आणि पैसा सुद्धा मिळतो. परंतु श्रीलंकेसाठी वर्ल्ड कप खेळलेला माजी क्रिकेटर सूरज रणदीव याच्यावर बस ड्रायव्हरचं काम करण्याची वेळ आली आहे. माजी क्रिकेटर सूरज रणदीव 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला होता. जिथे तो सध्या ड्रायव्हर म्हणून काम करण्यासोबतच एका लोकल क्लबमध्ये क्रिकेट सुद्धा खेळतो. माजी क्रिकेटर सूरज रणदीव याने श्रीलंकेसाठी 12 टेस्ट, 31 वनडे आणि 7 टी 20 सामने खेळले आहेत. यात रणदीवने एकूण 89 विकेट्स घेतल्या. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात ड्रायव्हरच काम करत असताना रणदीवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हेही वाचा : पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराला सुवर्णपदक, तर मोना अगरवालची कांस्य पदकाला गवसणी
भारतीय क्रिकेट चाहते गोलंदाज सूरज रणदीव याला नो बॉलमुळे ओळखतात. रणदीव हा तोच गोलंदाज आहे ज्याने भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग 99 वर खेळत असताना त्याचं शतक पूर्ण होऊ नये म्हणून मुद्दाम नो बॉल टाकला होता. एका सामन्यात टीम इंडियाला जिंकण्यासाठी केवळ एक रनची गरज होती आणि सहवाग 99 रन पर फलंदाजी करत होता. मात्र यावेळी सेहवागचं शतक पूर्ण होऊ नये म्हणून दिलशानच्या सांगण्यावरून रणदीवने मुद्दाम नो बॉल टाकला. मात्र या बॉलवर सुद्धा सेहवागने षटकार ठोकला. यानंतर अंपायरने टीम इंडियाला विजयी घोषित केले गेले पण नो बॉलवर मारलेल्या षटकाराचे रन्स यात जोडले नाहीत, त्यामुळे सामन्याअंती सेहवाग सुद्धा 99 धावांवर नॉट आउट राहिला होता. यानंतर श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने रणदीवला एका सामन्यासाठी निलंबित केले होते तर दिलशानवर दंडात्मक कारवाई केली होती.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सूरज रणदीव उदरनिर्वाहासाठी ऑस्ट्रेलियामध्ये राहून बस ड्रायव्हरची नोकरी करत आहे. फक्त सूरजच नाही तर श्रीलंकेचे अजून एक माजी क्रिकेटर चिंतका नमस्ते आणि झिम्बाब्वेकडून खेळलेले वाडिंग्टन वायेंगा हे सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये राहून बस ड्रायव्हरची नोकरी करत आहे.