IPL 2020 : मुंबईला जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमारची लव्हस्टोरीही तितकीच रंजक

पाहा कोण आहे त्याची जोडीदार...

Updated: Oct 30, 2020, 04:36 PM IST
IPL 2020 : मुंबईला जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमारची लव्हस्टोरीही तितकीच रंजक
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आयपीएलच्या IPL 2020 यंदाच्या हंगामात नुकत्याच झालेल्या बंगळुरूसोबतच्या सामन्यात मुंबईच्या संघातील एक खेळाडू चांगलाच चमकला. नावाप्रमाणंच किर्ती दाखवणारा हा खेळाडू होता सूर्यकुमार यादव. सोशल मीडियापासून ते निवड समितीपर्यंत सर्वच ठिकाणी सध्या या खेळाडू चर्चेचा विषय ठरत आहे. अशा या खेळाडूचं खासगी आयुष्यसुद्धा अनेक चर्चांना वाव देत आहे. 

वयाच्या २२ व्या वर्षी अवघ्या १९ वर्षांच्या एका मुलीची नृत्यकला पाहून तिच्यावर हा खेळाडू भाळला होता. मुख्य म्हणजे त्यानंतर याच मुलीशी तो विवाहबंधनातही अडकला. 

सूर्यकुमार मुळचा वाराणासीचा असला तरीही वडिलांच्या कामानिमित्त काही वर्षांपूर्वीच त्याचं कुटुंब मुंबईत वास्तव्यास आलं. मुंबईतच त्याचं शिक्षणही झालं. सूर्यकुमार पोतदार महाविद्यालयात शिकत होता. २०१२ मध्ये तो पहिल्यांदाच देविशाला भेटला होता. सूर्यकुमार बीकॉमच्या फर्स्ट इयरला होता, तर देविशानं नुकतंच महाविद्यालयात प्रवेश केला होता.

एका पार्टीदरम्यान सूर्यकुमार आणि देविशाची नजरानजर झाली होती. यावेळी सूर्यकुमार तिचा डान्स पाहून घायाळ झाला होता. पाहता पाहता त्यांचं नातं नकळतच आकारास येऊ लागलं. अखेर पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी २०१६ मध्ये लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. प्रेमाच्या सामन्यातही या खेळाडूनं खऱ्या अर्थानं आपली छाप सोडली असंच म्हणावं लागेल. 

 

खेळाविषयी सांगावं तर, २०११ पासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये खेळतोय. सर्वप्रथम तो मुंबईच्या संघाकडून खेलत होता. त्यानंतर २०१३ मध्ये त्याला कोलकाता संघानं विकत घेतलं होतं. २०१८ मध्ये पुन्हा एकदा मुंबईनं सूर्यकुमार यादवसोबत करार केला.