मुंबई : एका वर्षापूर्वी दिनेश कार्तिकनं बांगलादेशविरुद्धच्या टी-२०मध्ये ८ बॉलमध्ये ३२ रनची तडाखेबाज खेळी केली होती. शेवटच्या बॉलला सिक्स मारून कार्तिकनं भारताला मॅच जिंकवून दिली होती. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्येही कार्तिकला अशीच कामगिरी करण्याची संधी होती. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १६ रनची गरज होती, पण भारताला ११ रनच करता आल्या आणि त्यामुळे सामना ४ रननी गमवावा लागला.
या पराभवामुळे भारतानं टी-२० सीरिज २-१नं गमावली. भारताच्या या पराभवानंतर दिनेश कार्तिकवर टीका करण्यात येत आहे. मॅचच्या शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकनं एकही रन काढली नाही. शेवटच्या बॉलवर मात्र त्यानं सिक्स मारली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या पराभवाला दिनेश कार्तिक जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया क्रिकेट रसिकांनी व्यक्त केल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या टीमनंही ट्विटरवरून दिनेश कार्तिकवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
'कृणाल पांड्यानं १३ बॉलमध्ये नाबाद २६ रन केल्या, पण शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला फक्त १ बॉल खेळायला मिळाला. हार्ड लक केपी', असं ट्विट मुंबई इंडियन्सनं केलं आहे.
.@krunalpandya24 26 not-out from 13 balls and got to face only 1 ball in the final over.
Hard luck, KP! #CricketMeriJaan #NZvIND pic.twitter.com/BVm2HmDguA
— Mumbai Indians (@mipaltan) February 10, 2019
शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी १६ रनची गरज होती. ओव्हरच्या पहिल्या बॉलला कार्तिकनं २ रन घेतल्या. यानंतर दुसऱ्या बॉलवर एकही रन मिळाली नाही. तिसरा बॉल कार्तिकनं लाँग ऑनच्या दिशेनं खेळला, तरी दिनेश कार्तिकनं रन काढली नाही. कृणाल पांड्या खेळपट्टीच्या मध्यावर आला तरी कार्तिकनं रन काढण्याची इच्छा दाखवली नाही. तिसऱ्या बॉलवर कार्तिकनं रन काढली असती तर भारताला विजयासाठी ३ बॉलमध्ये १३ रनची गरज पडली असती, आणि कृणाल पांड्या बॅटिंगला आला असता. कृणाल पांड्या त्यावेळी १२ बॉलमध्ये २५ रनवर खेळत होता आणि तो चांगल्या लयीतही होता, पण तरी त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही.
यानंतर चौथ्या बॉलवर दिनेश कार्तिकनं मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये तो अपयशी ठरला. चौथ्या बॉलवर कार्तिकला एकच रन काढता आली. पाचव्या बॉलवर कृणाल पांड्यानं १ रन घेऊन पुन्हा कार्तिकला बॅटिंगची संधी दिली. शेवटच्या बॉलवर भारताला जिंकण्यासाठी ११ रनची गरज होती. पण बॉलरन वाईड बॉल टाकल्यामुळे भारताला एक रन आणि बॉल अधिकचा मिळाला. आता शेवटच्या बॉलवर भारताला १० रनची आवश्यकता होती. हे आव्हान अशक्य होतं. दिनेश कार्तिकनं शेवटच्या बॉलवर सिक्स तर मारली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.