Pakistan Beat Bangladesh Babar Azam Talks About Match Against India: आशिया चषक स्पर्धेमधील सुपर 4 फेरीतील पहिला सामना बुधवारी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झाला. हा सामना पाकिस्तानने 7 गडी राखून जिंकला. एकदिवसीय सामन्याच्या दृष्टीने विचार केल्यास हा सामना फार लो स्कोअरिंग म्हणजेच कमी धावांचा ठरला. बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानच्या भन्नाट गोलंदाजीपुढे बांगलादेसला केवळ 194 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करत 40 व्या ओव्हरमध्येच सामना जिंकला. पाकिस्तान सुपर 4 च्या फेरीमध्ये या विजयासहीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानचा पुढील सामना 10 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना श्रीलंकेमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर या सामन्यासंदर्भात पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने महत्त्वाचं विधान केलं आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशदरम्यानचा सामना अटीतटीचा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ज्या पद्धतीने बांगलादेशने या स्पर्धेत आतापर्यंत खेळ केला आहे ते पाहता तुलनेनं तगड्या पाकिस्तानी संघाला बांगलादेशचे खेळाडू विजयासाठी झुंजवतील असं मानलं जात होतं. मात्र तसं काहीही झालं नाही. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे वेळोवेळी बांगलादेशच्या विकेट्स पडत राहिल्या आणि संपूर्ण 50 षटकं खेळण्याआधीच 194 धावांवर बांगलादेशचा संघ तंबूत परतला. लाहोरच्या मैदानात खेळणाऱ्या पाकिस्ताने संघाने हे लक्ष्य सहज पूर्ण केलं.
सामना जिंकल्यानंतर बाबर आझमने सामन्यातील कामगिरीचं विश्लेषण केलं. "या विजयाचं पूर्ण श्रेय आमच्या गोलंदाजांना जातं. आधी शाहीन आणि आता हारिस. आम्ही फहीम अशरफला निवडण्याचा निर्णय़ घेतला कारण या खेळपट्टीवर फार गवत होतं. आम्हाला ही खेळपट्टी फारच भावली. आम्ही जेव्हा या मैदानावर खेळतो तेव्हा आम्हाला प्रेक्षकांकडून फार पाठिंबा मिळतो. मला अपेक्षा आहे की त्यांनी या सामन्याचा आनंद घेतला असेल," असं बाबर म्हणाला.
पुढील सामना भारताविरुद्ध असल्याचा उल्लेख करत बाबारने, "या विजयामुळे आम्ही पुढील सामन्यांमध्ये अधिक आत्मविश्वासाने खेळू. आम्ही कायमच मोठ्या सामन्यांसाठी तयार असतो. आम्ही भारताविरुद्ध खेळताना स्वत:ला 100 टक्के झोकून देण्यास तयार आहोत," असंही म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. यामुळे चाहते बरेच नाराज झाले होते. मात्र आता दोन्ही संघाच्या चाहत्यांना भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहता येणार आहे.
भारत पाकिस्तानदरम्यानचा 'सुपर-4'चा हा सामना 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. मोबाईलवर हा सामना जिओ टीव्हीबरोबरच डिस्ने-हॉट स्टारवर पाहता येईल.