पाकिस्तानचा गोल्डन बॉय नदीमला पाक सरकारकडून 10 लाखांचं बक्षीस? पाक पीएम ट्रोल

Arshad Nadeem Gold Medal : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमने विक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली. पण या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 9, 2024, 07:04 PM IST
पाकिस्तानचा गोल्डन बॉय नदीमला पाक सरकारकडून 10 लाखांचं बक्षीस?  पाक पीएम ट्रोल title=

Arshad Nadeem Gold Medal : पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic 2024) मध्ये विक्रमाला गवसणी घातली. अंतिम फेरीत अरशद नदीमने (Arshad Nadeem) 92.97 मीटर भाला फेकत नवीन ऑलिम्पिक विक्रम रचला आणि सुवर्ण पदक (Godl Medal) पटकावलं. तब्बल 32 वर्षांनी पाकिस्तानला ऑलम्पिकमध्ये पदक मिळालं आहे. याआधी पाकिस्तानने 1992 बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये हॉकीत कांस्य पदक पटकावलं होतं. नदीमने भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रालाही मागे टाकलं. नीरजने रौप्य पदकाची कमाई केली. नदीमच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्याचं अभिनंदन केलं. पण यावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

पाक पंतप्रधानांकडून नदीमचं अभिनंदन
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीप यांनी अरशद नदीम याचं स्वागत करताना सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यावरुन त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. या फोटोत पाक पंतप्रधान शहबाज शरीफ नदीमला 10 लाख रुपयांचा धनादेश देताना दिसत आहे. भारतीय रुपयात याची किंमत 3 लाख रुपये होते. पण या फोटोनंतर पाकिस्तान चाहत्यांनी सोशल मीडियावरुन पाक पीएमना चांगलंच सुनावलं आहे. वास्तविक हा फोट मे 2024 मधला हे. अरशद नदीम हा पॅरिसमध्ये आहे आणि पीएम शहबाज शरीफ हे पाकिस्तानात आहेत. त्यामुळे फोटो टाकताना किमान धनादेशावरील रक्कम तरी पाहायला हवी होती, असं पाक क्रीडा प्रेमींनी त्यांना सुनावलं आहे. 

पाकिस्तान अभिनेत्याकडून बक्षीस
अरशद नदीमच्या सुवर्ण कामगिरीने पाकिस्तानमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफरने त्याला 1 मिलियन बक्षीस रक्कम देण्याचं जाहीर केलं आहे. अली जफरने नदीम सुवर्णपदक जिंकण्याची भविष्यवाणी आधीच केली होती. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. अली फाऊंडेशनच्या माध्यमातून नदीमला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. 

सिंध सरकारकडून बक्षीस जाहीर
पाकिस्तान केंद्र सराकारने अद्याप मदतीची घोषणा केली नसली तरी पाकिस्तानमधल्या सिंध राज्य सरकारने नदीमला पाच कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. दरम्यान पाकिस्तान सरकारकडून अरशद नदीमसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. नदीमचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत असल्याचं पाकिस्तान सरकारने म्हटलंय. याचवेळी नदीमला पुरस्कार जाहीर केला जाणार आहे. तसंच पाकिस्तानच्या ससंदेतही अरशद नदीमच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. संसदेत अध्यक्षांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी नदीमला शुभेच्छा दिल्या.