दुबई : इंडियन प्रीमियर लीगदरम्यान जर 'बायो-बबल'चं उल्लंघन झालं तर खेळाडूला स्पर्धेतून बाहेर जावू लागू शकते आणि त्याच्या संघाला एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. एवढेच नाही तर गुणतालिकेमध्ये देखील गुण कमी केले जावू शकतात.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्व आठ फ्रँचायझींना सूचित केले आहे की, खेळाडूला 'बायो-बबल'मधून' जर बाहेर गेला तर त्याला 6 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. दुसऱ्यांदा असं झाल्यास त्याला सामन्यातून काढले जावू शकते. तसेच त्याच्या जागी दुसरा खेळाडू देखील दिला जाणार नाही.
जीपीएस ट्रॅकर्स घातले नाही किंवा वेळेवर कोरोना टेस्ट केली नाही तर खेळाडूला 60,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. हेच नियम कुटुंबातील सदस्य आणि संघाच्या इतर अधिकाऱ्यांना देखील लागू असणार आहेत.
युएईमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या प्रत्येक पाचव्या दिवशी सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाते. कडक 'बायो-बबल'चे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी टीम अधिकाऱ्यांनीही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
जर एखाद्या फ्रेंचायझीने एखाद्या व्यक्तीला बबलमधील प्लेअर / सहाय्यक कर्मचार्यांशी संवाद साधण्याची परवानगी दिली तर त्यांना पहिल्या उल्लंघनासाठी 1 कोटी रुपये दंड भरावा लागेल, दुसर्या उल्लंघनासाठी एक गुण कमी तर तिसऱ्या उल्लंघनासाठी दोन गुण वजा केले जातील.