मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. फक्त भारत सरकारच नाही, तर वेगवेगळ्या संघटनांकडूनही पाकिस्तानवर दबाव वाढवला जात आहे. भारताच्या या दबावाचा फटका आता पाकिस्तानला बसायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चे सामने आता टीव्हीवर दिसणार नाहीत. पीएसएलचं प्रक्षेपण करणाऱ्या आयएमजी रिलायन्सनं पीएसएलचे सामने न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामातल्या हल्ल्यानंतर आयएमजी रिलायन्सनं हे पाऊल उचललं आहे.
'काही दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेमुळे भारतीय जवान शहीद झाले. यामुळे आम्ही पीएसएलच्या प्रक्षेपणाची सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामामध्ये झालेली घटना निषेधार्ह आहे', असा मेल आयएमजी रिलायन्सनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे शोएब शेख आणि कमील खान यांना पाठवला आहे.
आयएमजी रिलायन्स ही पीएसएलचं प्रक्षेपण करणारी एकमेव संस्था आहे. या कंपनीनं माघार घेतल्यामुळे पीसीबीला प्रक्षेपणासाठी नवी कंपनी मिळाली नाही, तर पीएसएल टीव्हीवर दिसणार नाही.
'आयएमजी रिलायन्सनं आम्ही पीएसएल २०१९चं प्रक्षेपण करणार नाही, याची माहिती आम्हाला दिली आहे. पीसीबीकडे याबद्दलची दुसरी योजना तयार आहे', अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान यांनी दिली आहे.
पीएसएलच्या चौथ्या मोसमाला गुरुवारपासून दुबईमध्ये सुरुवात झाली आहे. या टीममध्ये ६ टीम सहभागी झाल्या आहेत. सध्या ही स्पर्धा शारजाह आणि दुबईमध्ये खेळवण्यात येत आहे. तर या स्पर्धेच्या शेवटच्या ८ मॅच पाकिस्तानमध्ये खेळवल्या जातील. पीएसएलची फायनल कराचीमध्ये खेळवली जाईल.