मुंबई : टीम इंडियाची भींत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर जगभरातून वाह-वाह मिळवली. त्याने आपल्या करिअरमधली आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कामगिरी ऑस्ट्रेलियामध्ये केली. पुजाराने 74.42 च्या रनरेटने 521 रन केले. ज्यामध्ये ३ शतकांचा समावेश आहे. यासाठी त्याला 'मॅन ऑफ द सीरीज'चा पुरस्कार देखील मिळाला. भारताने ही सीरीज 2-1 ने जिंकली. यानंतर चेतेश्वर पुजाराने म्हटलं की, 'हा सगळ्यांसाठी एक शानदार क्षण होता. आम्ही परदेशात सिरीज जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली. ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज जिंकणं सोपं नसतं. मी ज्या भारतीय टीमचा भाग होतो त्यापैकी ही सर्वश्रेष्ठ होती. मी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो.'
भारतीय क्रिकेट टीमने 71 वर्षांचा रेकॉर्ड मोडत ऑस्ट्रेलियामध्ये पहल्यादा टेस्ट सिरीज जिंकली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभा केला. पण पावसामुळे हा सामना ड्रॉ झाला. 4 सामन्यांची सिरीज भारताने 2-1 ने जिंकली. भारताने पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्या नावे केली. भारताने 2017 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने ही सिरीज जिंकत ही ट्रॉफी मिळवली होती.
टेस्ट सिरीजमध्ये आपल्या शानदार कामगिरीनंतर पुजाराने म्हटलं की, 'मी माझ्या योगदानाने खूश आहे. एक फलंदाज म्हणून मी गती आणि बाऊंस दोघांचा सामना केला. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये मला काही गोष्टींमध्ये सुधार करण्यासाठी मदत मिळाली. माझ्या मते हे सगळं सुधारावर अवलंबून आहे आणि मी चांगल्या प्रकारे तय़ार होतो. एडिलेडमध्ये शतक ठोकणं आणि 1-0 ने आघाडी घेणं हे आमचं पहिलं लक्ष्य होतं.'
पुजाराने म्हटलं की, 'मी स्वदेशात काही प्रथम श्रेणी सामने आणि आयपीएल दरम्यान काउंटी क्रिकेट खेळणार आहे. पुढची टेस्ट सिरीज 6-7 महिन्यानंतर आहे त्यासाठी तयारी करण्यासाठी मला वेळ मिळेल. मला मर्यादीत ओव्हर क्रिकेट खेळायची आहे पण माझी प्राथमिकता टेस्ट सामने आहे आणि नेहमी तिच राहिलं.'