तरुण आहे 'जाफर' अजुनी! ४०व्या वर्षी वसीम जाफरची दुसरी इनिंग

विदर्भाच्या टीमनं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

तरुण आहे 'जाफर' अजुनी! ४०व्या वर्षी वसीम जाफरची दुसरी इनिंग

नागपूर : विदर्भाच्या टीमनं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. सौराष्ट्रविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये विदर्भाचा ७८ रननी विजय झाला आहे. विदर्भाचा बॅट्समन वसीम जाफरचा हा १०वा रणजी ट्रॉफी विजय आहे. मुख्य म्हणजे वसीम जाफरनं त्याच्या कारकिर्दीत १० रणजी ट्रॉफी फायनल खेळल्या आहेत. यातल्या ८ वेळा वसीम जाफर मुंबईच्या टीममध्ये होता. ४० वर्षांच्या वसीम जाफरची क्रिकेटमधली ही दुसरी इनिंग चांगलीच यशस्वी ठरली आहे.

२०१६-१७ सालच्या मोसमात वसीम जाफरच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे वसीम जाफरला बराच काळ स्थानिक क्रिकेटला मुकावं लागलं होतं. या दुखापतीनंतर वसीम जाफरनं पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचं ठरवलं. पण वय लक्षात घेता बऱ्याच टीम जाफरला संधी देण्यासाठी इच्छूक नव्हत्या. एवढच नाही तर वसीम जाफर ज्या कंपनीत काम करतो त्या इंडियन ऑईललाही जाफर आता क्रिकेट खेळू शकणार नाही, असं वाटलं होतं. इंडियन ऑईलनं वसीम जाफरला डेस्कवर बसून काम करायलाही सांगितलं होतं.

या प्रतिकूल परिस्थितीमध्येही जाफरनं हार मानली नाही. १८ वर्ष मुंबईसाठी खेळल्यानंतर आणि मुंबईला ८ रणजी ट्रॉफी जिंकवून दिल्यानंतर वसीम जाफरनं २०१५-१६ साली विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. आता २०१९ मध्ये वसीम जाफरनं त्याच्या कारकिर्दीत १०व्यांदा आणि विदर्भासाठी सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी उचलली. २०१८-१९ या मोसमात विदर्भाला रणजी ट्रॉफी जिंकवून देण्यात ४० वर्षांच्या जाफरनं महत्त्वाची भूमिका बजावली.

सौराष्ट्रविरुद्धच्या फायनलमध्ये वसीम जाफरला मोठी खेळी करता आली नाही. या मॅचमध्ये जाफर २३ आणि ११ रनवर आऊट झाला. पण जाफर या रणजी मोसमात विदर्भाचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. २०१८-१९ या मोसमात वसीम जाफरनं ११ मॅचमध्ये ६९.१३ च्या सरासरीनं १,०३७ रन केल्या. यामध्ये ४ शतकं आणि क्वार्टर फायनलमधल्या उत्तराखंडविरुद्धच्या २०६ रनचा समावेश आहे. रणजी ट्रॉफीच्या मोसमात दोनवेळा १ हजार रनचा टप्पा ओलांडणारा जाफर हा एकमेव खेळाडू आहे. २००८-०९ च्या मोसमात वसीम जाफरनं मुंबईकडून खेळताना १६ इनिंगमध्ये ८४ च्या सरासरीनं १,२६० रन केल्या होत्या.

विदर्भाला सलग दुसऱ्यावेळी रणजी ट्रॉफी जिंकवून दिल्याबद्दल वसीम जाफरनं विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे आभार मानले आहेत. 'मुंबईकडून खेळणं सोडलं तेव्हा पुन्हा कधी रणजी ट्रॉफी फायनल खेळेन, असं वाटलंच नव्हतं. दोन वर्षात दोन फायनल, यावर माझा विश्वासच बसत नाही. पण चंद्रकांत पंडित यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं वसीम जाफर म्हणाला.

४०व्या वर्षी २ द्विशतकं

उत्तराखंडविरुद्धच्या रणजी क्वार्टर फायनलमध्ये वसीम जाफरनं द्विशतक झळकावलं. ४० वर्षांचा झाल्यानंतर २ द्विशतकं झळकावणारा जाफर हा पहिला भारतीय आणि पहिला आशियाई बॅट्समन बनला. वयाची ४० वर्ष पूर्ण केल्यानंतरचं जाफरचं हे दुसरं द्विशतक होतं. याआधी २०१७-१८ साली जाफरनं रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध द्विशतक केलं होतं. वसीम जाफरनं आत्तापर्यंत ९ द्विशतकं आणि ३ त्रिशतकं केली आहेत. रणजी ट्रॉफीमध्येही वसीम जाफरच्या नावावर १० हजारपेक्षा जास्त रन आहेत.

वसीम जाफरच्या मोठ्या खेळी

३१४ रन नाबाद मुंबईसाठी 

२१८ रन भारत एसाठी 

२६७ रन मुंबईसाठी 

२१२ रन भारतासाठी

२०२ रन भारतासाठी

२५६ रन मुंबईसाठी 

३०१ रन मुंबईसाठी

२८६ रन विदर्भासाठी 

२०६ रन विदर्भासाठी