मुंबई : अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट मॅचदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात अजूनपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नांगरहार प्रांतामध्ये क्रिकेट मॅच सुरु असताना हा स्फोट झाला आहे. या स्फोटात ४५ जणं जखमीही झाले आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये रात्री या स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये खेळाडू आणि शेकडो दर्शक उपस्थित होते. त्यावेळी हा स्फोट झाला. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या स्फोटामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या स्फोटामध्ये अफगाणिस्तानचा आणि सध्या आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या राशिद खानच्या मित्राचाही मृत्यू झाला आहे. रमदान कपमध्ये एका पीस टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. या हल्ल्यामध्ये मृत झालेल्यांना राशिद खाननं श्रद्धांजली वाहिली आहे. हा बॉम्बस्फोट राशिद खान राहात असलेल्या शहरात झाला आहे. या हल्ल्यात राशिदचा मित्र हिदायतुल्लाह जहिर याचा मृत्यू झाला.
हिदायतुल्लाहनंच या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. दहशतवादाच्या अंधाराला शांतीच्या मार्गानंच दूर केलं जाऊ शकतं, असा या स्पर्धेचा संदेश होता. मित्राच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर राशिद खानला धक्का बसला. राशिदचा मित्र प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन करत होता. या स्पर्धेला रमदान कप असं नाव देण्यात आलं होतं.
हिदायतुल्लाहच्या मृत्यूनंतर राशिद खाननं भावनिक ट्विट केलं आहे. तुझी नेहमीच आठवण येईल भावा, असं ट्विट राशिद खाननं केलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. पण पूर्व अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी संघटना आणि इस्लामिक स्टेट सक्रिय आहे. पण तालिबाननं मात्र हा हल्ला आपण केल्याचा इन्कार केला आहे.
You will be missed bro #RIP you did lots of hard work always tried to make Nengrahar shining City Allah De Tolo shahedano ta janatona naseeb kre Aw Zakhmyano ta de rogh sehat pe dua yma #nangrahar #Blast #RamadanCup pic.twitter.com/p00P0Elsmb
— Rashid Khan (@rashidkhan_19) May 19, 2018