IPL : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात आज संध्याकाळी होणार सामना प्रत्येक चाहत्यासाठी महत्त्वाचा आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार असून कर्णधार विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरची टीम आमने-सामने असणार आहे. कोहलीला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. तर हैदराबाद संघाने बंगळुरूचा पराभव करून चॅम्पियन होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते.
कोहलीसाठी शुक्रवारचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे, प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या या संघाचा प्रवास आज पराभव झाला तर संपू शकतो. बंगळुरुपुढे हैदराबादचं तगडं आव्हान असणार आहे. हैदराबादने सलग 3 सामने जिंकले आहेत तर बंगळुरुने सलग 4 सामने गमवले आहेत.
13 व्या मोसमातील अॅलिमिनेटरमध्ये स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये 16 वेळा सामना झाला आहे. यापैकी बंगळुरूने 8 तर हैदराबाद संघाने 7 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील 1 सामन्याचा निकाल अर्निर्णित राहिलेला आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात बंगळुरूने 10 धावांनी विजय मिळविला होता. तर हैदराबादने दुसर्या सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवला होता.
2016 मध्ये, जेव्हा हैदराबाद संघाने जेव्हा आयपीएलचं विजेतेपद जिंकले होते तेव्हा त्यांच्यासमोर बंगळुरूचाच संघ होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 7 विकेट्सवर 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बंगळुरूचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 200 धावाच करू शकला होता. अंतिम सामना बंगळुरुने 8 धावांनी गमवला होता. पण आजचा सामना आयपीएल फायनल नसली तरी या दोन्ही संघासाठी ही फायनलच असणार आहे. कारण 4 वर्षानंतर दोन्ही संघामध्ये पुन्हा एकदा कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 2016 मध्ये कोहलीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न यंदा पुन्हा हैदराबाद अपूर्ण ठेवतं की, बंगळुरु फायनलपर्यंत पोहोचते हे पाहणं उत्सकतेचं ठरणार आहे.