T20 World Cup: उलटफेरांनी बदललं सुपर-8 चं समीकरण; न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याच्या मार्गावर

T20 World Cup Super 8 Qualification Scenario: आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करत केला होता. ज्यामुळे अ गटाची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. जाणून घेऊया सुपर 8 चं समीकरण कसं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 12, 2024, 08:17 AM IST
T20 World Cup: उलटफेरांनी बदललं सुपर-8 चं समीकरण; न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याच्या मार्गावर title=

T20 World Cup Super 8 Qualification Scenario: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले. यामध्ये अनेक बलाढ्य देशांना कमकुवक देशांकडून पराभ स्विकारावा लागला आहे. यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. दरम्यान वर्ल्डकपमध्ये झालेल्या या उलटफेरामुळे सुपर 8 चं समीकरण अधिक रंजक झालं आहे. आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करत केला होता. ज्यामुळे अ गटाची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. जाणून घेऊया सुपर 8 चं समीकरण कसं आहे. 

ग्रुप 'ए' चं समीकरण

भारताशिवाय अ गटात पाकिस्तान, कॅनडा, आयरर्लंड आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारत सध्या 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर यजमान अमेरिकेचेही 4 पॉईंट्स झाले आहेत. सुपर-8 मध्ये भारताचे स्थान निश्चित असून जर पाकिस्तानला सुपर 8 मध्ये स्थान मिळवायचं असेल पुढील दोन सामने यूएसए हरेल अशी आशा करावी लागेल. पण आता अमेरिकेने एकही सामना जिंकला तर सुपर-8 मध्ये त्याचे स्थान जवळपास निश्चित होईल. त्यामुळे एकंदरीत ए ग्रुपमधून भारत आणि यूएसए सुपर-8 मध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे.

ग्रुप 'बी' चं समीकरण

बी ग्रुपमध्ये पाहिल्यास ओमान आधीच 3 सामन्यांत 3 पराभवांसह बाहेर आहे. सध्या, स्कॉटलंडकडे 3 सामन्यांत 2 विजय आणि एक सामना रद्द झाल्यानंतर 5 गुण आहे. नामिबिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरल्यामुळे कांगारू टीम पात्र ठरली आहे. दुसरीकडे इंग्लंड आणि स्कॉटलंडपैकी फक्त एकच सुपर 8 मध्ये प्रवेश करू शकेल. स्कॉटलंडने शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते पात्र ठरणार आङे. पण स्कॉटलंडचा पराभव झाला तरी इंग्लंड ओमान आणि नामिबियावर मोठ्या फरकाने जिंकणार नाही अशी आशा करावी लागेल.

ग्रुप 'सी' चं समीकरण

सी ग्रुपमध्ये अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडचा 84 रन्सने पराभव झाल्याने समीकरणे बिघडलेली दिसतायत. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने आतापर्यंत त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि 4 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. पापुआ न्यू गिनी आणि युगांडा प्रत्येकी एक सामना गमावल्यास वर्ल्ड कपमधून बाहेर होतील. पण न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानही तिघांमध्येही सुपर 8 ची लढत रंगतदार ठरणार आहे. 

ग्रुप 'डी' चं समीकरण

'ड' गटातील तिन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 मध्ये स्थान जवळपास निश्चित केलंय. दुसऱ्या स्थानासाठी उर्वरित 4 टीम्समध्ये लढत होणार आहे. श्रीलंकेने 2 सामने गमावले असून त्यांना सुपर 8 गाठायची असेल तर पुढील दोन सामने जिंकावे लागतील. याशिवाय इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावं लागणार आहे. अशा स्थितीत 13 जून रोजी होणाऱ्या नेदरलँड विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालामुळे डी ग्रुपमधील दोन टीम पुढील टप्प्यात जाऊ शकतात.