Ricky Ponting Health Update : ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगची (Ricky Ponting) तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे पॉण्टिंगला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज कसोटी मालिका (Australia vs West Indies Test Series) सुरु असून या मालिकेत रिकी पॉण्टिंग कॉमेंट्री करतोय. कॉमेंट्री (Live Commentry) करत असताना आज अचानक त्याच्या छातील दुखू लागलं. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजदरम्यान दोन कसोटींची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 30 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवशी लंचनंतर खेळ सुरु झाल्यानंतर कॉमेंट्री करत असातना पॉण्टिंगची तब्यात खालावली. पॉण्टिंगला चक्कर येत होती त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याचं सांगण्यात येत आहे. पॉण्टिंगला पर्थमधल्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डेली टेलीग्राफने दिलेल्या माहितीनुसार पॉण्टिंगची प्रकृती आता स्थिर आहे.
चॅनेल 7 साठी कॉमेंट्री
रिकी पॉण्टिंग चॅनल 7 साठी कॉमेंट्री करत आहे. यासंदर्भात चॅनेल 7 ने रिकी पॉण्टिंगच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. पॉण्टिंगची प्रकृती ठिक नसून आज ते कॉमेंट्री करु शकणार नाहीत, तसंच शनिवारीही ते कॉमेंट्रीसाठी उपलब्ध नसतील असं सांगण्यात आलं आहे.
पॉण्टिंगची क्रिकेट कारकिर्द
ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रिकी पॉण्टिंगची गणना होते. पॉण्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन वेळा वर्ल्ड कपचं (ODI World Cup) जेतेपद पटकावलं आहे. रिकी पॉण्टिंग कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 मध्ये वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.
सर्वाधिक शतकांच्या यादीत पॉण्टिंग
रिकी पॉण्टिंगने नोव्हेंबर 2012 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. पॉण्टिंग आपल्या देशासाठी 168 कसोटी, 375 एकदिवसीय आणि 17 टी20 सामने खेळला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दित त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 13,378 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13,704 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्येही त्याच्या खात्यात 401 धावा जमा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत पॉण्टिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे, पॉण्टिंगने 71 शतकं केली आहेत. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावावरही 71 शतकं जमा आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत 100 शतकांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.