Rishabh Pant: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत मागील वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातामध्ये (Rishabh Pant Accident) जखमी झाला. पंत या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आधी उत्तराखंडमध्ये आणि नंतर मुंबईत उपचार करण्यात आले असून सध्या तो दुखापतीमधून सावरत आहे. काही आठवड्यापूर्वीच त्याने स्वत:चा कुबड्या घेऊन चालतानाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. अपघातानंतर जवळजवळ 2 महिन्यांनी पंतने पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने आपल्या फिटनेसबद्दल स्पष्टपणे मतं मांडली आहेत. इतकचं नाही या अपघातानंतर जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला आहे असंही पंतने सूचित केलं आहे. तसेच आपण लवकरच क्रिकेटच्या मैदानामध्ये दिसू असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
आयएएनएसला पंतने विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पंतने मला पूर्वीपेक्षा आता फार बरं वाटत असल्याचं सांगितलं. मी फार वेगाने रिकव्हरी करतोय. ही सर्व देवाची कृपा आणि मेडिकल टीमने केलेल्या मदतीमुळे शक्य झालं आहे. मी लवकरच पूर्णपणे फीट होईल. हा प्रवास माझ्यासाठी फारच कठीण होता. माझ्यावर या दिवसांमध्ये अनेक शस्त्रक्रिया झाल्या. मी आता माझ्या आयुष्याचा पुरेपुर आनंद घेऊ इच्छितो. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन मिळवण्यासाठी कठोर मेहनत करण्याची माझी तयारी आहे, असंही पंतने म्हटलं आहे.
"खास करुन माझ्या अपघातानंतर मला स्वत: ब्रश करणंही फार समाधान देणारं वाटतं. मला सूर्यप्रकाशात उभं राहणंही फार आवडतं. मी क्रिकेट फार मीस करतो. मी आता माझ्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे," असं पंतने मुलाखतीत सांगितलं.
आयपीएल 2023 च्या पर्वाच्या आधी दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठीही पंतने खास संदेश दिला आहे. "मी आनंदी आहे आणि सर्वाचा आभारी आहे. माझ्या आजूबाजूला एवढे चाहते आहेत ही फार समाधानाची बाब आहे. टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा देत राहा हाच माझा चाहत्यांसाठी संदेश असेल. आम्हाला सर्वांवरील तुमचं प्रेम असेच व्यक्त करत राहा. मी लवकरच तुम्हा सर्वांना आनंद देण्यासाठी मैदानावर पुनरागमन करेन," असंही पंत चाहत्यांना दिलेल्या विशेष संदेशामध्ये म्हणाला.
काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापकीय टीममधील सदस्य असलेल्या सौरव गांगुलीने पंतबरोबर आपली चर्चा होते असं सांगितलं होतं. तसेच पंतची सध्याची स्थिती पाहता त्याला दोन वर्षांचा कालावधी मैदानामध्ये पुन्हा उतरण्यासाठी लागू शकतो असंही गांगुलीने म्हटलं होतं. यंदा आयपीएलमध्ये डेव्हीड वॉर्नर दिल्लीच्या संघाचं नेतृ्त्व करण्याची दाट शक्यता आहे.