दुबई : आयपीएलच्या 13 व्या सत्राच्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही खेळाडू आमने-सामने असतील. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. दुबईमध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद 7 व्या स्थानावर आहे. 9 पैकी 3 सामने त्यांनी जिंकले आहेत. अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मोठा विजय मिळविल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा आत्मविश्वास वाढला असेल. 10 पैकी 4 सामने त्यांनी जिंकले आहेत.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 12 सामने (2013-2020) झाले आहेत. दोन्ही संघ 6-6 सामने जिंकून बरोबरीत आहेत. या हंगामात राजस्थानने दोघांमधील पहिला सामना जिंकला होता.
प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी सनरायझर्सला उर्वरित पाच सामने जिंकावे लागतील, तर रॉयल्सला विजयाचा सिलसिला कायम राखण्यासाठी हा विजय मिळवावा लागेल.
आयपीएल अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे आणि अशा परिस्थितीत दोन्ही संघांचा मार्ग सोपा नाही आणि दोन्ही संघांना हे माहित आहे की, त्यांना आता सगळे सामने जिंकावेच लागणार आहेत.
जोफ्रा आर्चर रॉयल्सकडून गोंलदाजीचे नेतृत्व करीत आहे, तर श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवतिया यांच्या फिरकी जोडीने सुपर किंग्जविरुद्धच्या मधल्या ओव्हरमध्ये शानदार कामगिरी केली. कर्णधार स्टीव्ह स्मिथला गुरुवारी त्याच्या गोलंदाजांकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
जोस बटलरने सुपर किंग्ज विरूद्ध फलंदाजीत चमकदार कामगिरी करत स्मिथला कोणत्याही दबावाशिवाय खेळू दिले. पण रॉयल्सला भागीदारीची आवश्यकता असेल.
अष्टपैलू बेन स्टोक्स अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, तर रॉबिन उथप्पा संघातील सर्वात कमकुवत दुवा असल्याचे सिद्ध होत आहे. अशा परिस्थितीत स्मिथ मनन वोहराला संधी देण्याचा विचार करू शकतो. संजू सॅमसनचा फॉर्म देखील संघासाठी चिंतेचा विषय आहे. ज्याने सलग दोन अर्धशतकांसह स्पर्धेला सुरुवात केली.
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघाचा रविवारी नाईट रायडर्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला होता. या पराभवामुळे डेव्हिड वॉर्नरचा संघ नक्कीच निराश असेल. परंतु या संघाला यावर लवकरात लवकर मात करावी लागेल आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांची रणनीती बदलावी लागेल.