आपल्या वाढदिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून मोठी घोषणा; लोकांनाही सचिनचं आवाहन

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे

Updated: Apr 24, 2021, 05:20 PM IST
आपल्या वाढदिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून मोठी घोषणा; लोकांनाही सचिनचं आवाहन

मुंबई : भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्या निमित्ताने त्याने प्लाझमा डोनेट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. त्याने सांगितले की, तो पूर्णपणे ठीक आहे आणि जेव्हा तो प्लाझ्मा देण्यास पात्र असेल तेव्हा तो ते डोनेट करेल.

सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून तो बरा झाला आहे. त्यामुळे तो आपला प्लाझमा कोरोना रुग्णांना डोनेट करु शकतो.

तेंडुलकर म्हणाला की, "तुमच्या प्रार्थना आणि इच्छा, त्याच बरोबर माझ्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या शुभेच्छांमुळे, तसेच सर्व डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मला सकारात्मक ठेवल्यामुळे मी यातुन लवकर बरा होवु शकलो. त्या बद्दल सर्वांचे आभार."

सचिन प्लाझ्मा दान करणार

आपल्या ट्वीटर हँडलवर व्हिडीओ शेअर करत सचिन म्हणाला, "मला एक संदेश द्यायचा आहे, जो मला डॉक्टरांनी द्यायला सांगितला आहे. मी प्लाझ्मा डोनेट केंद्राचे उद्घाटन केले तेव्हा डॅाक्टरांनी मला सांगितले की, जर योग्य वेळी प्लाझ्मा दिला गेला तर, रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. जेव्हा मी पूर्णपणे पात्र होईन तेव्हा मी माझा प्लाझमा डोनेट करेन. मी माझ्या डॉक्टरांशी या बद्दंल बोललो आहे."

पुढे तो म्हणाला की, "ज्या लोकांना या आधी कोरोना होऊन गेला आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही पात्र झाल्यावर कृपया रक्तदान करा. ज्यामुळे बर्‍याच लोकांना याचा फायदा होऊ शकतो."

तेंडुलकरला (Sachin Tendulkar) 8 एप्रिलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आणि तो घरी आयसोलेशनमध्ये होता. प्लाझ्मा डोनेट करणाऱ्या व्यक्तिला प्लाझमा डोनेट करण्यापूर्वी 14 दिवसांपर्यंत कोणतीही कोरोना लक्षणे नसावीत. त्यामुळे सचिन सध्या प्लाझमा दान करायला पात्र नाही.