एव्हरेस्टवीर लेकीचा पुरस्कार घेताना बापाच्या डोळ्यात पाणी! राष्ट्रपतींसमोर आई ढसाढसा रडली

Savita Kanswal Get National adventure award : लेकीचं नाव स्क्रिनवर झळकताच सविता कंसवालच्या वडिलांना आणि आईला अश्रू अनावर झाले. पुरस्कार घेण्यासाठी उभ्या असलेल्या वडिलांच्या (Savita Kanswal Father Get Emotional) डोळ्यात अश्रू तरळले मात्र, त्यांनी धीर धरला.

सौरभ तळेकर | Updated: Jan 9, 2024, 08:25 PM IST
एव्हरेस्टवीर लेकीचा पुरस्कार घेताना बापाच्या डोळ्यात पाणी! राष्ट्रपतींसमोर आई ढसाढसा रडली title=
Savita Kanswal Father Emotional

Savita Kanswal Father Receive award : भारतीय महिला गिर्यारोहक सविता कंसवाल (Savita Kanswal) यांना मरणोत्तर तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 (Tenzing norgay national adventure award 2022) प्रदान करण्यात आला आहे. वडील राधेश्याम कंसवाल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. लेकीचं नाव स्क्रिनवर झळकताच सविता कंसवालच्या वडिलांना आणि आईला अश्रू अनावर झाले. पुरस्कार घेण्यासाठी उभ्या असलेल्या वडिलांच्या (Savita Kanswal Father Get Emotional) डोळ्यात अश्रू तरळले मात्र, त्यांनी धीर धरला. मात्र, आईला डोळ्यातील अश्रू रोखता आले नाहीत. 2022 मध्ये उत्तरकाशीमधील शिखर सर करण्यासाठी गेलेल्या सविता कंसवाल यांना हिमस्खलनामुळे आपला जीव गमवावा लागला होता.

सविता कंसवालनं 12 मे 2022 रोजी जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टवर 8 हजार 848 मीटर उंच तिरंगा फडकावला होता. यानंतर 15 दिवसांनी सविता  8 हजार 463 मीटर उंच मकालू पर्वतावर पोहोचली होती. 25 वर्षाच्या मुलीनं 16 दिवसांत जगातील सर्वोच्च शिखरं सर करुन नवा विक्रम प्रस्तापित केला होता. तिच्या याच उल्लेखनिय कामगिरीमुळे भारत सरकारने सविताला मरणोत्तर तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार जाहीर केला होता. तिचा हा अवॉर्ड घेण्यासाठी तिच्या कुटूंबियांनी हजेरी लावली होती.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सविताचे वडील राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून मरणोत्तर पुरस्कार स्वीकारताना दिसत आहेत. या व्हिडिओत त्याचे संपूर्ण कुटुंब भावूक झाल्याचं पहायला मिळतंय. अवॉर्ड घेताना तिच्या वडिलांचे डोळे तरळले. तर सविताच्या आई आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं. आपल्या लाडक्या लेकीच्या पराक्रमाचा अवॉर्ड स्विकारताना वडिलांचा ऊर भरून आला.

पाहा Video

जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) पर्वतावर भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या सविता कंसवालचा (Savita Kanswal) उत्तराखंड (Uttarakhand) मधील उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात (Avalanche) मृत्यू झाला होता. द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात सवितासह नेहरू पर्वतारोहण संस्थेचे 29 प्रशिक्षणार्थी अडकले होते. एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्यदल, आयटीबीपीचे पथक यांच्या अथक प्रयत्नानंतर देखील सविता कंसवालला वाचवण्यात अपयश आलं होतं.