एडिनबर्ग : स्कॉटलंडच्या टीमनं क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या स्कॉटलंडनं वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचा पराभव केला आहे. स्कॉटलंडनं ठेवलेल्या ३७२ रनचा पाठलाग करताना इंग्लंडची टीम ३६५ रनवर ऑल आऊट झाली. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोनं ५४ बॉलमध्ये शतक केलं. बेअरस्टो फटकेबाजी करत असताना इंग्लंडला विजयाची आशा होती पण बेअरस्टो आऊट झाल्यावर इंग्लंडची बॅटिंग गडगडली आणि त्यांचा ६ रननी पराभव झाला. इंग्लडच्या लियाम प्लंकेटनं नाबाद ४७ रन केले. एकावेळी इंग्लंडचा स्कोअर २२०/२ असा होता. पण स्कॉटलंडच्या बॉलरनी पलटवार करत इंग्लंडची अवस्था २७६/७ अशी झाली. मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये एकूण ७३७ रन झाल्या. मार्च महिन्यानंतर स्कॉटलंडचा ही पहिली मॅच होती. इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९ वर्ल्ड कपचं स्कॉटलंडचं क्वालिफिकेशन थोडक्यात हुकलं होतं.
याआधी स्कॉटलंडच्या कॅलम मॅकलियॉडनं नाबाद शतक करत टीमचा स्कोअर ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ३७१ रनपर्यंत पोहोचवला. मॅकलियॉडनं नाबाद १४० रनची खेळी केली. स्कॉटलंडचा हा वनडे क्रिकेटमधील हा सर्वाधिक स्कोअर आहे. चार वर्षांपूर्वी स्कॉटलंडनं क्राईस्टचर्चमध्ये कॅनडाविरुद्ध ३४१/९ एवढा स्कोअर केला होता.
स्कॉटलंडनं पहिल्या १५ ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून १०७ रन केले होते. मॅकलियॉडनं यानंतर शानदार सुरुवात करत जॉर्ज मुनसे(५५) सोबत १०७ रनची पार्टनरशीप केली. २९ वर्षांच्या मॅकलियॉडनं फक्त ७० बॉलमध्ये शतक केलं. वनडे क्रिकेटमधलं मॅकलियॉडचं हे सातवं शतक आहे. तर टेस्ट खेळणाऱ्या देशाविरुद्ध मॅकलियॉडचं हे पहिलं शतक आहे. मॅकलियॉडचं ९४ बॉलमध्ये नाबाद १४० रन केले. यामध्ये १६ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.