वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. याआधी तिसरी टी-२० मॅचही भारताने सुपर ओव्हरमध्येच जिंकली होती. सुपर ओव्हरमध्ये पहिले बॉलिंग करताना भारताकडून बुमराहने बॉलिंग केली. न्यूझीलंडकडून टीम सायफर्टने ८ आणि कॉलिन मुन्रोने ५ अशा एकूण १३ रन केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली ६ रनवर नाबाद राहिला, तर केएल राहुल १० रन करुन आऊट झाला. त्यामुळे भारताने ५ मॅचच्या सीरिजमध्ये ४-०ने आघाडी घेतली आहे.
वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियममध्ये झालेल्या या मॅचचा हिरो होता मुंबईकर शार्दुल ठाकुर. शार्दुल ठाकूरने १५ बॉलमध्ये २ फोर मारून २० रनची महत्त्वाची खेळी केली आणि मनिष पांडेला साथ दिली. यानंतर बॉलिंग करताना शार्दुलने ४ ओव्हरमध्ये ३३ रन देऊन २ विकेट घेतल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडकडला विजयासाठी ७ रनची गरज असताना ठाकूरने फक्त ६ रन देऊन मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली. या कामगिरीबद्दल शार्दुल ठाकूरला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं.
मॅच संपल्यानंतर शार्दुल ठाकूर म्हणाला, 'यापेक्षा चांगला निकाल काय असू शकतो? कधीच आशा सोडायच्या नाहीत, हे आम्ही मागच्या मॅचमधून शिकलो. जर मी एकही रन दिली नाही किंवा विकेट घेतली तर दुसऱ्या टीमवर दबाव येतो.'
या २ मॅचनंतर आपण नव्या गोष्टी शिकल्याचं भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे. 'मॅचदरम्यान शांत राहून स्वत:वर ताबा ठेवला पाहिजे. काय चाललं आहे ते पाहिलं पाहिजे आणि मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे. लागोपाठ २ मॅच अशापद्धतीने संपल्या. चाहते यापेक्षा जास्तची अपेक्षा करु शकत नाहीत,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
'याआधी आम्ही सुपर ओव्हरमध्ये खेळलो नव्हतो. आता आम्ही लागोपाठ २ सुपर ओव्हरमध्ये खेळलो. मॅच जिंकणार नाही, असं वाटत असताना तुम्ही पुनरागमन करता, हे पाहून चांगलं वाटतं. सुपर ओव्हरमध्ये केएल राहुल आणि संजू सॅमसन ओपनिंगला खेळायला जाणार होते, कारण राहुल आणि संजू मोठे शॉट मारतात. पण अनुभव असल्यामुळे मी मैदानात गेलो. दबावामध्ये इनिंग सांभाळणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं,' असं वक्तव्य विराटने केलं.
'पहिल्या २ बॉलवर मोठे शॉट मिळाल्यानंतर बॉलला गॅपमध्ये खेळवण्याचं मी ठरवलं. मी बराच कालावधी सुपर ओव्हरचा भाग नव्हतो, पण टीमच्या विजयामुळे खुश आहे,' असं विराटने सांगितलं.