विराट कोहलीने चिटींग केल्याचा आरोप! आकाश चोप्रा म्हणतो, 'त्याला माहित होतं की...'

SL vs IND ODI Virat Kohli Controversy: विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. विराटच्या या खेळीवरुनच आता आकाश चोप्राने एक विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 7, 2024, 09:52 AM IST
विराट कोहलीने चिटींग केल्याचा आरोप! आकाश चोप्रा म्हणतो, 'त्याला माहित होतं की...' title=
युट्यूब व्हिडीओमध्ये बोलताना केलं हे विधान

SL vs IND ODI Virat Kohli Controversy: भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीवर चिडीचा डाव खेळल्याचा म्हणजेच चिटींगचा आरोप केला आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीला एलबीडब्ल्यू बाद देण्यात आलं नव्हतं. यावरुन श्रीलंकन खेळाडूंनीही मैदानात संताप व्यक्त केला होता. मात्र आता श्रीलंकन खेळाडूंनंतर थेट भारताच्या माजी क्रिकेटपटूने आणि विद्यमान समालोचकाने विराटसंदर्भात आपल्या युट्यूब चॅनेलवरील एका विश्लेषणात्मक व्हिडीओमध्ये विराटच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीचा उल्लेख करत धक्कादायक दावा केला आहे.

नक्की घडलेलं काय?

240 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना सामन्यातील 15 व्या ओव्हरला विराटसंदर्भात एक विचित्र प्रकार मैदानात घडला. श्रीलंकन फिरकीपटू अकिला धनंजयाने टाकलेला ऑफ ब्रेक बॉल अपेक्षेपेक्षा अधिक फिरला. त्यामुळे बॅक फूटवर जाऊन लेग साईडला चेंडू टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू विराटच्या पॅडला लागला. श्रीलंकन खेळाडूंनी अपिल केल्यानंतर विराटला बाद घोषित करण्यात आलं. विराटने लगेच रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूदरम्यान अल्ट्रा एजचा निकाल मोठ्या स्क्रीनवर दिसण्यास वेळ लागला. बॉल बॅटजवळून गेला तेव्हा अल्ट्रा एजमध्ये स्पाइक दिसून आला. याच आधारे तिसरे पंच जो विल्सन यांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलून कोहलीला नाबाद ठरवलं.

मैदानात उघडपणे नाराजी

स्क्रीनवर विराट नॉट आऊट असल्याचं झळकल्यानंतर विराट हसला. मात्र दुसरीकडे श्रीलंकन संघातील खेळाडूंना या निकालावर विश्वास बसत नव्हता. विराटला नाबाद जाहीर केल्यानंतर श्रीलंकन विकेट कीपर कुशल मेंडिसने संतापून आपलं हेल्मेट जमीनीवर आपटलं. तर असलंकाने पंच रविंद्र विमालासीरी यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. श्रीलंकेचा प्रशिक्षक सनथ जयसूर्यानेही ड्रेसिंग रुममधून नाराजी व्यक्त केली. तो या बदलेल्या निर्णयाबद्दल चेहरा पाडून सहकाऱ्यांशी बोलताना दिसून आला. 

आकाश चोप्रा यावर काय म्हणाला?

विराटच्या बॅट आणि बॉलमध्ये फट असल्याचं दिसत होतं. मात्र अल्ट्रा एज तंत्रज्ञानानुसार स्पाइक दिल्याने बॉल बॅटला लागल्याचं समजून त्याला नाबाद घोषित करण्यात आलं. याचबद्दल चोप्राने त्याच्या युट्यूबवरील चॅनेलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत मत व्यक्त केलं आहे. "कोहलीला बाद देण्याचा तो प्रकार फार रंजक होता. तो बॉल विराटच्या बॅक पॅडलला लागला आणि त्याने लगेच रिव्ह्यू घेतला. खरं तर विराटलाही ठाऊक होतं की बॉल बॅटला लागलेला नाही. मात्र अल्ट्रा इजमध्ये तसं दिसून आलं. यावरुन फार मोठा गोंधळ झाला कारण प्रत्येकाला असं वाटत होतं की ही विकेट अकिला धनंजयाला मिळायला हवी होती," असं आकाश चोप्रा म्हणाला.

दरम्यान, विराटला नाबाद ठरवण्यात आलं तरी त्याला या संधीचा मोठा फायदा घेता आला नाही. यानंतर चार ओव्हर झाल्या आणि जेफरी वेंडरसेच्या गोलंदाजीवर बाद होऊन विराट तंबूत परतला. विराटने 19 बॉलमध्ये 14 धावा केल्या.