Virat vs BCCI: सौरव गांगुली यांनी समोर येऊन उत्तर द्यावं!

दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीने केलेल्या वक्तव्यावरून वाद आणखी वाढला आहे.

Updated: Dec 18, 2021, 12:33 PM IST
Virat vs BCCI: सौरव गांगुली यांनी समोर येऊन उत्तर द्यावं! title=

मुंबई : स्टार फलंदाज आणि सध्याचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. यानंतर टीम इंडियातील गोंधळ अजूनही थांबताना दिसत नाही. दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीने केलेल्या वक्तव्यावरून वाद आणखी वाढला आहे.

एकदिवसीय कर्णधारपद काढून टाकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विधान केलं की त्यांनी विराट कोहलीला टी-20 कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. मात्र विराटने ते ऐकलं नाही. तर दुसरीकडे, विराटने सांगितलं की, मला कधीच कर्णधारपद सोडण्यापासून कोणी थांबवलं नाही.

या दोन वेगवेगळ्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसह अनेक माजी खेळाडूंनीही आश्चर्य व्यक्त केलंय. 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य मदन लाल यांनी मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे मागणी केली की, त्यांनी पुढे येऊन संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करावा.

मदनलाल म्हणाले, "मला वाटतं की हा संपूर्ण मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आला असता. मुळात हा वादाचा मुद्दा नाही. पण बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांनी पुढे येऊन सर्व गोष्टी समोर आणायला हव्यात."

माजी वेगवान गोलंदाज मदन लाल यांनीही विराट कोहलीला विनंती केली की, त्यानेही मॅनेजमेंट सोबत असलेला वाद संपवावा. निवडकर्त्यांनी कर्णधारपद परत घेण्यापूर्वी विराट कोहलीला कळवलं होतं की नाही हे मला माहीत नाही.