मुंबई : राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर १९ क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला तब्बल १०० रन्सनी हरवलं. या विजयाबरोबरच भारताकडे आता २ पॉईंट्स आहेत.
टॉस जिंकून पहिले बॅटिंग करताना भारतानं ऑस्ट्रेलियाला ३२९ रन्सचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया २२८ रन्सवरच ऑल आऊट झाली.
भारताकडून कमलेश नागरकोटी आणि शिवम मावीनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर अभिषेक शर्मा आणि अनुकूल रॉयला एक-एक विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये ९४ रन्स करणाऱ्या कॅप्टन पृथ्वी शॉ ला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
राजस्थानच्या बाडमेरमध्ये राहणारा कमलेश नागरकोटी अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या पहिल्याच मॅचमुळे चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मॅचमध्ये नागरकोटीनं १४९-१५० किमी प्रती तासच्या वेगानं बॉल टाकला आणि दिग्गजांना हैराण केलं. या मॅचमध्ये कमलेशनं अनेक बॉल १४५ किमी प्रती तासाच्या वेगानं टाकले.
नोएडाच्या शिवम मावीनंही त्याच्या जलद बॉलिंगमुळे लक्ष वेधून घेतलं. शिवम मावीनं जवळपास १४५ किमी प्रती तासाच्या वेगानं बॉलिंगकरून ऑस्ट्रेलियाला तगडं आव्हान दिलं. मावीनं सगळ्यात जलद बॉल १४६ किमी प्रती तासानं फेकला.
कमलेश नागरकोटी आणि शिवम मावीची ही भेदक बॉलिंग बघून सौरव गांगुली कमालीचा खुश झाला आहे. तसंच विराट कोहली आणि बीसीसीआयनं या खेळाडूंकडे लक्ष द्यावं, असा सल्ला गांगुलीनं दिला आहे. स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून गांगुलीनं हा सल्ला दिलाय.
@imVkohli @VVSLaxman281 @BCCI keep an eye on two under 19quicks ..mavi and nagarkotti ..bowling at 145 in newzealand ..brilliant ..
— Sourav Ganguly (@SGanguly99) January 14, 2018
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनंही या दोन्ही फास्ट बॉलर्सचं कौतुक केलं आहे.
This was serious pace from our boys. Solid beginning beating the Aussies by 100 runs. May the hunger continue and we carry the momentum. #U19CWC pic.twitter.com/zL75RDxjN3
— Virender Sehwag (@virendersehwag) January 14, 2018