इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यातलंच एक नाव म्हणजे वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) . न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी20 सामन्यासाठीच्या भारतीय क्रिकेट संघात (India vs New Zealand T20) आवेश खानचा समावेश करण्यात आला आहे. आवेश खानच्या निवडीने तो रहात असलेल्या इंदौरमध्ये (Indore) आनंदाचं वातावरण आहे. नातेवाईक आणि भेटायला येणाऱ्या चाहत्यांची त्याच्या घरी रीघ लागली आहे. सर्वजण आवेश खानला शुभेच्छा देत आहेत.
आवेश खानला भारतीय संघात संधी मिळाल्याने त्याचे वडिल आणि कुटुंबिय खुश आहेत. आवेशचे वडिल मोहम्मद आशिक खान यांनी सांगितलं की मुलाला भारतीय संघात खेळताना पाहण्याचं स्वप्न पहात होते आणि आज ते स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आवेश खानने भारतीय संघात स्थान मिळवल्याचं ते सांगतात.
मध्य प्रदेश संघाकडून (Madhya Pradesh) खेळणाऱ्या आवेश खानला आयपीएलमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं त्याने सोनं केलं. आपल्या कामगिरीची छाप त्याने आयपीएलमध्ये उमटवली. याच दमदार कामगिरीची भारतीय क्रिकेट बोर्डाने दखल घेतली आहे. 14 वर्षाखालील संघातून खेळतानाच आवेश खानला त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे ओळख मिळाली होती. 2016 मध्ये आवेश खान 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतही खेळला. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याने पटकावला होता.
यानंतर आवेश खानचं नाव अचानक गायब झालं. गेल्या दोन-तीन वर्षात त्याला खूप संघर्ष करावा लागला. मानसिक आणि शारिरीक परीक्षा घेणार हा काळ होता. आवेशने खूप मेहनतही घेतली. पण त्याला योग्य संधी मिळू शकली नाही.
आपल्या मुलाची निवड झाल्यानंतर आवेशच्या वडिलांनी प्रथम एमपीसीए अकादमीचे माजी प्रमुख अमय खुरासिया यांना फोन केला. मोहम्मद आशिक यांनी सांगितलं की, 10 वर्षांपूर्वी खुरासियाजीने MPCA अकादमीसाठी आवेशची पहिल्यांदा निवड केली होती. ते आवेशला मुलाप्रमाणे वागवतात. तेव्हा खुरासियाजी म्हणाले होते की, आवेशने टीम इंडियासाठी खेळावे हे माझे स्वप्न आहे. आजही मला ती गोष्ट आठवली म्हणून मी त्याला फोन करून सांगितले की त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्याच्या मुलाची भारताच्या संघात निवड झाली आहे.
आवेशचे वडील मोहम्मद आशिक खान यांचं इंदूरमध्ये पानाचं दुकान आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलाला खेळण्यास प्रोत्साहन दिलं. आज या संघर्षाला सोन्याची किनार लाभली आहे.