तळवलकरांची क्लासिकल श्रीमंत स्पर्धा 28 नोव्हेंबरला

  भारतातील शरीरसौष्ठवाची सर्वात ग्लॅमरस आणि श्रीमंत स्पर्धा म्हणजे अर्थातच तळवलकर क्लासिक 2017 पुन्हा मुंबईकरांना देहभान विसरायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 2, 2017, 11:31 PM IST
 तळवलकरांची क्लासिकल श्रीमंत स्पर्धा 28 नोव्हेंबरला  title=

 मुंबई :  भारतातील शरीरसौष्ठवाची सर्वात ग्लॅमरस आणि श्रीमंत स्पर्धा म्हणजे अर्थातच तळवलकर क्लासिक 2017 पुन्हा मुंबईकरांना देहभान विसरायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे. 

यंदाची तळवलकर क्लासिक गतवेळपेक्षा अधिक ग्लॅमरस  आणि भव्यदिव्य करण्यासाठी ऐतिहासिक षणमुखानंद सभागृहात आयोजित केली जाणार आहे. लोकांना शरीरसौष्ठवाचे महत्त्व पटवून देताना शरीरसौष्ठवपटूंना व्यावसायिकतचे धडे  आणि उत्पन्नाचे साधन मिळवून देणाऱया व्यायाममहर्षी मधुकर तळवलकरांच्या कल्पेनेतून आणि पुढाकाराने शरीरसौष्ठवातील सर्वात श्रीमंत अशी तळवलकर क्लासिक स्पर्धा येत्या 27 आणि 28 नोव्हेंबरला मुंबईत रंगेल. या स्पर्धेच्या सोबतीला मोजक्या मिश्र दुहेरीतील फिट ऍण्ड फाइन जोड्या आपले तालबद्ध फिटनेस प्रदर्शन दाखविण्यासाठी उत्सुक आहेत.

भारतातील सर्वात पीळदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱया 30 दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचा या स्पर्धेत सहभाग असल्यामुळे तळवलकर क्लासिक स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. 

तळवलकर्स बेटर वॅल्यू फिटनेस लिमिटेडच्या आयोजनाखाली होत असलेली तळवलकरांची स्पर्धा क्लासिक ठरावी म्हणून मि.वर्ल्ड, मि.एशिया, मि. इंडियासारखे सर्वोच्च बहुमान संपादणारे सर्वच खेळाडू आपले कसब पणाला लावण्यासाठी सज्ज होत आहेत.

 विशेष म्हणजे ही स्पर्धा केंद्र सरकारची मान्यता असलेल्या इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने होत असल्यामुळे शरीरसौष्ठवातील सुपरस्टार षणमुखानंदच्या अतिभव्य मंचावर पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांनी प्रथमच मिळणार आहे. यापूर्वी शरीरसौष्ठवाची एकही स्पर्धा या ऐतिहासिक सभागृहात आयोजित झालेली नाही. एवढेच नव्हे तर पुरूष आणि महिलांची मिश्र स्पर्धाही मोजक्या जोड्यांच्या सहभागामुळे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल. स्पर्धेची प्राथमिक फेरी जुहू येथील समुद्रकिनारी असलेल्या जुहू हॉटेलमध्ये  27 नोव्हेंबरला खेळविली जाईल तर अंतिम फेरी म्हणजेच तळवलकर क्लासिकची टॉप टेन स्पर्धा 28 नोव्हेंबरला षणमुखानंद सभागृहात इतिहास रचेल.
 
 
 नुकत्याच मंगोलिया येथे झालेल्या मि.वर्ल्ड स्पर्धेत सुवर्ण पटकावणारा महाराष्ट्राचा महेंद्र चव्हाण, सलग तीनवेळा भारत श्री काबिज करणारा सुनीत जाधव, मि. आशियाचा तीनवेळा मानकरी ठरलेला बॉबी सिंग,गतविजेता राम निवास, सागर जाधव,  अक्षय मोगरकरसारखे बाहुबली आपल्या पीळदार स्नायूंनी मुंबईकरांना भुरळ घालण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत. भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद असलेले रेल्वे आणि महाराष्ट्राचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. त्याखेरीज ओडिशा, दिल्ली, तामीळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेशचे स्टार तळवलकर क्लासिकच्या टॉप टेनमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. भारताचे खरेखुरे ग्लॅमर सर्वात श्रीमंत स्पर्धेसाठी  ऐतिहासिक षणमुखानंदच्या मंचावर अवतरतील असा विश्वास आयबीबीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केला. भारतीय शरीरसौष्ठवपटूंचा आंतरराष्ट्रीय चेहरा पाहण्याची नामी संधीही याच स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईकरांना मिळेल, असेही पाठारे म्हणाले. क्रीडाप्रेमी आणि शरीरसौष्ठवाचे उपासक असलेल्या तळवलकरांसारख्या दिग्गजांमुळेच आमचा खेळ बलवान होत असल्याची भावना महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव ऍड.विक्रम रोठे यांनी व्यक्त केली.

20 लाखांची बक्षिसे आणि मिश्र जोडी स्पर्धा

तळवलकर क्लासिक ही आजवरची सर्वात श्रीमंत स्पर्धा ठरणार आहे. 20 लाखांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत विजेता 6 लाखांचा मानकरी ठरेल. टॉप टेनवर बक्षीसांचा पाऊस पाडला जाणार असून उपविजेता 3 लाखांचा तर दहावा क्रमांक 50 हजारांचा धनी होईल. मिश्र जोडींच्या या स्पर्धेत विजेती जोडीही लखपती होईल अशी माहिती आयोजकांनी दिली.

सारे काही शरीरसौष्ठवाच्या प्रेमासाठी- मधुकर तळवलकर

गेली सहा दशके मी शरीरसौष्ठवाशी बांधील आहे. समाजात फिटनेस विषयी जागरूकता निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी म्हणून मी तळवलकर क्लासिकच्या नावाने शरीरसौष्ठवाचा मोठा सोहळा पुन्हा एकदा त्याच जोशात आयोजित करण्याचे ठरवले आहे. याचबरोबर उदयोन्मुख खेळाडूंना आपले ध्येय  साध्य करता यावे यासाठी मी सदैव प्रयत्न करीत असतो. यंदा मिश्र जोडीचा फिजिक इव्हेंटही ठेवला आहे. हा इव्हेंट सर्व विवाहित जोडप्यांसाठी प्रेरणादायी ठरावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. आजही अनेकांना फिटनेस क्लब किंवा जिम मध्ये जाणे खर्चिक वाटते. पण तुम्ही एकदा आजारी पडाल तेव्हा तुम्हाला कळेल की आजारपणासाठी किती खर्च होते ते. त्यामुळे फिटनेस हे प्रत्येकाचे दैनंदिन काम व्हायला हवे.

तळवलकर क्लासिकने खेळाचा दर्जा उंचावला

शरीरसौष्ठवाचे पितामह असलेल्या मधुकर तळवलकरांनी तळवलकर क्लासिकचे आयोजन करून खेळाचा दर्जा उंचावला आहे. प्रचंड खर्चामुळे खेळाडू शरीरसौष्ठवापासून दूर होत होते, पण अशा स्पर्धांमुळे नव्या खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळू लागले आहे. ही स्पर्धा शरीरसौष्ठवासाठी एक प्रोत्साहन आहे आणि याचा फायदा थेट खेळालाच होणार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या अंतिम फेरी धडक मारणारे अव्वल दहा खेळाडू किमान 50 हजार रूपये घेऊनच जाणार असल्यामुळे 30 खेळाडूंपैकी टॉप टेनसाठी या दिग्गजांमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळेल, असा विश्वास आयबीबीएफच्या चेतन पाठारे यांनी व्यक्त केला. ही स्पर्धा शरीरसौष्ठवपटूंना आर्थिक दृष्ट्या पाठबळ देणारी स्पर्धा असल्याचेही पाठारे यांनी आवर्जून सांगितले.