अख्खा देश फुकट जेवतोय, महाराष्ट्रातले सर्व भिकारी इथं....' शिर्डी प्रसादालयाबद्दल सुजय विखेंची मागणी

Shirdi Sai Sansthan:  सुजय विखेंच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्यास सुरुवात झालीये.

Pravin Dabholkar | Updated: Jan 5, 2025, 07:42 PM IST
अख्खा देश फुकट जेवतोय, महाराष्ट्रातले सर्व भिकारी इथं....' शिर्डी प्रसादालयाबद्दल सुजय विखेंची मागणी title=
सुजय विखे पाटील

Shirdi Sai Sansthan: कित्येक दिवसांपासून साई संस्थानच्या प्रसादलयात मोफत भोजनाचा महाप्रसाद दिला जात असून साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुलांच्या मुलींच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी साई संस्थानने खर्च करावे असंही सुजय विखे म्हणालेत. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत. हे योग्य नाही, असे ते म्हणाले. तसेच आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल आम्ही आंदोलन करू असंदेखील शिर्डीतील एका कार्यक्रमातील भाषणात ते म्हणाले. सुजय विखेंच्यां या वक्तव्याने वाद निर्माण होण्यास सुरुवात झालीये.

काय म्हणाले विश्वस्त?

सुजय विखे पाटलांनी त्यांच्या विचाराने जे वक्तव्य केलं आहे ते त्यांच्या दृष्टीने जरी बरोबर असल तरी मी हेच सांगेल की साई भक्त त्याठिकाणी पैसे जमा करत असतात. साई संस्थांनवर ताण येऊ नये म्हणून साई संस्थांनेच एक योजना आणली होती. कुणी अन्नदान करत असेल तर त्यांच्या नावाने फलक लावून साई भक्तांना मोफत जेवण देण्यात यावे, असे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर म्हणाले. अन्नदानासाठी 365 दिवस  देणगीदार बुकिंग करून ठेवतात. याचा आर्थिक बोजा सही संस्थांनवर नाहीये. साई संस्थानकडे साडेचारशे कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे तो निधी साई संस्थांनला अन्य कुठेही वापरता येत नाही. अनावश्यक लोकांनी येथे येऊन जेवण करणे आणि गुन्हेगारी वाढणे ह्या दृष्टीने हा विषय नसून जे साईभक्त कोट्यवधी रुपयाचे दान करतात त्यांना हॉटेलमध्ये जेवण करणं अवघड नाहीये. ते महाप्रसाद म्हणून साईबाबांचे भोजन करत असतात असं साई संस्थानचे माजी विश्वस्त म्हणाले.

सुजय विखे पाटील कुठल्या संदर्भाने बोलले हे आम्हाला माहीत नाही मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी देशभरातील देणगीदार साईभक्त साई संस्थांनला देतात आणि त्यातून अन्नदान होत असतं याच्या माध्यमातून देशभरातील भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेतात. ज्या साई भक्तांना ऐच्छिक रक्कम द्यायची ते देऊ शकतात. विकास कामांसाठी साईबाबा संस्थान कडे करोडो रुपयांचा निधी आहे ते त्यातून विकास करू शकतात त्यामुळे हे सगळं करण्याची आवश्यकता नसल्याचं संग्राम कोते यांनी म्हणलय.

सुजय विखे पाटलांनी जी भूमिका भाषणातून व्यक्त केली त्या भूमिकेला आमचं समर्थन असून पूर्वीपासून आम्ही ही मागणी करत होतो , की साई भक्तांनी दिलेल्या दानाचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने साई संस्थांनने करावा. साई संस्थान प्रसादलयात मोफत प्रसदामुळे काही लोक तो जेवण म्हणून घेतात आणि त्याचा दुरुपयोग देखील होतो आहे. शिर्डीत गुन्हेगारी आणि भिक्षेकरुनची संख्या वाढत आहे. कोणतीही गोष्ट मोफत असू नये साई संस्थांनच्या प्रसादालयातील भोजनाला मोल असावं आमचा असल्याचं शिंदे गटाचे पदाधिकारी कमलाकर कोते यांनी म्हणलय.

ज्या ठिकाणी शुल्क आकारायला पाहिजे त्या ठिकाणी शुल्क आकारलेच गेलं पाहिजे मात्र साईबाबांनी जी प्रथा सुरू ठेवली होती. साईबाबा मोफत सगळ काही करत होते.तेव्हा ते शुल्क आकारत नव्हते. बाकी दुसरीकडे शुल्क आकारले जावेत. मात्र ज्या ठिकाणी गरिबांना दोन घास मोफत मिळतात त्या ठिकाणी शुल्क करू नये अशी प्रतिक्रिया काही साई भक्तांनी दिली आहे.

तर काही साई भक्तांनी सुजय विखे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देत जो साईभक्त देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनाला येतो तो साईभक्त दहा ते पंधरा रुपयांचं शुल्क जेवणासाठी देऊ शकतो असं काही साईभक्त म्हणालेत. या प्रकाराबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना विचारले असता त्यांनी या प्रकाराबाबत बोलण्यास नकार दिलाय.