प्रचंड विजय! चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धुळ चारली... मालिकाही जिंकली

India vs Zimbabwe Live 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान खेळवण्या येणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबव रंगला. या सामन्यात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने झिम्बाब्वेला दहा विकेट राखून धुळ चारली.

राजीव कासले | Updated: Jul 13, 2024, 11:04 PM IST
प्रचंड विजय! चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धुळ चारली... मालिकाही जिंकली title=

India vs Zimbabwe Live Score, 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यानचा चौथा टी20 सामना हरारे स्पोर्ट्स क्बलच्या (Harare Sports Club) मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) यंग ब्रिगेडने झिम्बाब्वेवर प्रचंड मोठा विजय मिळवला. पहिली फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेने (Zimbabwe) टीम इंडियासमोर विजयासाठी 152 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विजयाचं हे आव्हान टीम इंडियाने 16 व्या षटकात एकही विकट न गमावता पार केलं. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिल (Shubman Gill) या सलामीच्या जोडीने 156 धावांची विक्रमी भागिदारी केली. 

झिम्बाब्वेला गुंडाळलं
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय अगदी अचूक ठरला. झिम्बाब्वे संघाला 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात केवळ 152 धावा करता आल्या. वेस्ले मधेवेरे (25) आणि मरुमानी (32) या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. पण यानंतर भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाची फलंदाजी गडगडली. कर्णधार सिकंदर रजाने 46 धावा करत संघाला किमान 150 धावांचा टप्पा पार करुन दिला. भारतातर्फे खलील अहमदने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबेने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

गिल-यशस्वीची फटकेबाजी
विजयासाठी 153 धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजीला सुरुवात केली. या दोघांनी विजयाचं आव्हान अवघ्या 16 व्या षटकात पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालने  53 चेंडूत नाबाद 93 धावा केल्या. यात 2 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार शुभमन गिलने  2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 39 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. गिल आणि यशस्वीने पहिल्या विकेटसाठी तब्बल 156 धावांची भागिदारी केली. भारतासाठी टी20 सामन्यात धावांचा पाठलाग करताना ही दुसरी सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. पहिल्या नंबरवरही या दोघांच्याच नावावर विक्रम आहे. 2023 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध गिल आणि यशस्वीने पहिल्या विकेटसाटी 165 धावांची भागिदारी केली होती.

टीम इंडियाने मालिका जिंकली
टीम इंडियाने या विजयाबरोबर पाच सामन्यांची टी20 मालिकाही खिशात घातली. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने पुढचे सलग तीन सामने जिंकत मालिकाही जिंकली. आता पाचवा टी20 सामना रविवारी म्हणजे 14 जुलैला खेळवला जाणार आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : यशस्वी जायसवाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.

झिम्बाब्वे : वेस्ली मधेवेरे, तदीवानाशे मारुमानी, ब्रायन बेनेट, डायोन मायर्स, सिकंदर रजा (कर्णधार), जॉनथन कँपबेल, फराज अकरम, क्लाइव मदंडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुजारबानी, तेंदई चटारा.