India vs Sri Lanka In Asia Cup Final : मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) त्यांच्याच घरात धुव्वा उडवला आणि एशिया कपचं जेतेपद पटकावलं, एशिया कपच्या इतिहासात टीम इंडियाने (Team India) तब्बल आठव्यांदा एशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. एशिया कप 2023 चा अंतिम सामना रविवारी कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअमवर (Premdasa Stadium) खेळवण्यात आला. श्रीलंकेने टॉस जिंकला आणि पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय त्यांनाच महागात पडला. लंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकात 50 धावांवर ऑलऊट झाला.
सिराज नावाचं वादळ
पावसामुळे भारत-श्रीलंका अंतिम सामना अर्धा तास उशीराने सुरु झाला. पण त्यानंतर मैदानावर सिराज नावाचं वादळ झालं आणि लंकेचा संघ पालापाचोळ्यासारखा उडून गेला. सिराजने अवघ्या सात धावांमध्ये सहा विकेट घेतल्या. यात एकाच ओव्हरमध्ये त्याने चार विकेट घेण्याचा विक्रम केला. एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. याशिवाय हार्दिक पांड्याने 3 तर जसप्रीत बुमराहाने एक विकेट घेत लंकेचं कंबरडं मोडलं. विजयाचं हे माफक आव्हान टीम इंडियाने एकही विकेट न गमावता पार केलं. शुभमन गिल आणि ईशान किशनने सहाव्या षटकातच टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
एशिया कपचा इतिहास
एशिया कपच्या इतिहासत भारतीय संघ अकराव्यांदा अंतिम फेरीत पोहचालय. विशेष म्हणजे यात भारत आणि श्रीलंका आठवेळा आमने सामने आले आहेत. यातल्या पाचवेळा भारताने विजय मिळवला. तर श्रीलंका तिनदा विजयी ठरलीय. एशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका 1988 मध्ये पहिल्यांदा आमने सामने आले. याता भारताने विजय मिळवला. त्यानंतर 1991 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या दुसऱ्यांदा अंतिम सामन्याचा थरार रंगला. यातही भारताने श्रीलंकेवर मात केली. तर 1995 मध्येही एशिया कपच्या फायनलमघ्ये टीम इंडिया जेतेपद पटकावलं होतं.
श्रीलंकेचा पलटवार
भारताने सलग तीन अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला. पण यानंतर श्रीलंकेने पलवार केला. 1997, 2004 आणि 2008 मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध सलग तीन अंतिम सामने जिंकून जेतेपदाची हॅटट्रीक केली. त्यानंतर 2010 मध्ये हे भारत आणि श्रीलंका सातव्यांदा अंतिम फेरीत आणने सामने आले. पण यावेळी भारताने लंकेच्या विजयी घोडदौडीला लगाम घातला आणि अंतिम सामना जिंकत सात वेळा एशिया कप जिंकण्याच पराक्रम केला. आता पुन्हा एकदा 2023 मध्ये भारत आणि श्रीलंकेत अंतिम सामना रंगला आणि भारताने पुन्हा एकदा लंकेवर मात करत एशिया कप उंचावला आहे.