नाओमी ओसाकानंतर रोजर फेडरर का घेणार French Open 2021 मधून माघार?

रॉजर फेरडररचं फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचं कारण ऐकून चाहत्यांना दु:ख होईल. असं नेमकं असं काय कारण आहे जाणून घ्या.

Updated: Jun 6, 2021, 12:11 PM IST
नाओमी ओसाकानंतर रोजर फेडरर का घेणार French Open 2021 मधून माघार? title=

मुंबई: जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्यानंतर आता आणखी एका स्टार खेळाडू यातून माघार घेण्याची शक्यता आहे. महान टेनिसपटू रॉजर फेडरर अंतिम 16 मध्ये पोहोचला असूनही फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचा विचार करत आहे. रविवारी फ्रेंच ओपनच्या तिसर्‍या फेरीत फेडररने डोमिनिक कोएफरचा 7-6, 6-7, 7-6, 7-5 ने पराभव केला. हा सामना 3 तास 35 मिनिटे चालला. फेररचा पुढचा सामना सोमवारी इटलीच्या माटेओसोबत होणार आहे. या सामन्यासाठी फेडरर उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

फेडरर फ्रेंच ओपनमधून का घेऊ शकतो माघार? 

सामना संपल्यानंतर फेडररने सांगितलं की, 'मला ठरवायचं आहे मी पुढे खेळायचं की नाही. मी पुढे खेळू शकेन की नाही हे मला आता सांगता येणार नाही.' 20 वेळा ग्रॅण्ड स्लेम मिळवणाऱ्या रॉजर फेडररच्या गुडघ्यावर 2020मध्ये सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे आता गुडघ्यांना जास्त त्रास देणं योग्य आहे की आराम करणं योग्य आहे यासाठी फेडररला विचार करायला वेळ हवा असल्याचं सांगितलं आहे.

रॉजरने पुढे म्हटलं की फ्रेंच ओपन 2021 पेक्षा विंबलडन हे माझं प्राधान्य आहे. 28 जूनपासून विंबलडन स्पर्धा सुरू होत आहेत. 'तीन तास कोर्टवर राहिल्यानंतर पुनर्मूल्यांकन करावं लागतं त्यानंतर सकाळी कोणत्या परिस्थितीत मी उठतो गुडघा त्या दिवशी कसा प्रतिसाद देतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात.' असंही फेडरर म्हणाला आहे. त्यामुळे आता फ्रेंच ओपनमधून तो खरंच माघार घेणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाओमी ओसाकाने घेतली होती माघार...

यंदाच्या वर्षातील दुसरं ग्रॅण्ड स्लॅम फ्रेंच ओपनमध्ये झालेल्या वादानंतर जगप्रसिद्ध टेनिसपटू नाओमी ओसाकाने माघार घेतली आहे. त्याआधी तिला मॅच रेफरीने 15 हजार डॉलर्सचा दंड देखील ठोठावला होता. त्यानंतर नाओमीने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

4 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारी नाओमी ओसाकाने 27 मे रोजी जाहीर केले की मानसिक प्रकृतीमुळे या वेळी स्पर्धेतील सामन्यानंतर ती माध्यमांशी बोलणार नाही. असं सांगितल्यानंतरही पत्रकार परिषदेला ती उपस्थित न राहिल्यानं तिला दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर नाओमीने स्पर्धेतून माघार घेतली आहे.