आजच्याच दिवशी युवराजने केला होता 'तो' विश्वविक्रम

युवराजच्या विक्रमाला १२ वर्ष पूर्ण

Updated: Sep 19, 2019, 02:58 PM IST
आजच्याच दिवशी युवराजने केला होता 'तो' विश्वविक्रम title=

मुंबई : १९ सप्टेंबर २००७ म्हणजे आजच्या दिवशीच १२ वर्षांपूर्वी युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात एक असा कारनामा केला होता, ज्यामुळे जगभरात त्याचा नावाचा डंका वाजला होता. केवळ युवराजसाठीच नाही तर ९ सप्टेंबर ही तारीख क्रिकेटच्या इतिहासातही सोनेरी अक्षरांनी लिहिली गेली आहे. याच दिवशी युवराजने सहा बॉलवर सहा सिक्स लगावले होते.

२००७ टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या या मॅचमध्ये युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारले होते. या सामन्यात युवराजने केवळ १२ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. ६ सिक्सर मारण्यासोबतच युवराजने सर्वात वेगवान अर्धशकत करण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला होता.

या मॅचदरम्यान ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारण्याआधी युवराज सिंगची ऍन्ड्रयू फिल्नटॉफबरोबर बाचाबाची झाली होती. यानंतर युवराजने तो सगळा राग स्टुअर्ट ब्रॉडवर काढला. युवराजने १६ बॉलमध्ये ५८ रन केले. २० ओव्हरमध्ये टीम इंडियाने ४ विकेट गमावून २१८ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० ओव्हरमध्ये २०० रनच करता आल्या. यामुळे भारताचा १८ रननी विजय झाला.

क्रिकेट इतिहासात एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारण्याचं रेकॉर्ड १९६८ साली गॅरी सोबर्स यांनी केला होता. पण सोबर्स यांचा हा विक्रम प्रथम श्रेणी मॅचमधला होता. यानंतर १६ वर्षांनी रवी शास्त्रींनी रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्येही एका ओव्हरमध्ये ६ सिक्स लगावले होते. २००७ च्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जनेही ६ सिक्स मारले होते. यानंतर युवराजने टी-२० वर्ल्ड कपमध्ये हा विक्रम केला.