विराटच्या 'या' कृतीवर उपरोधिक प्रतिक्रियांची झोड

जाणून घ्या त्याने आता केलं तरी काय 

Updated: Aug 25, 2019, 07:37 AM IST
विराटच्या 'या' कृतीवर उपरोधिक प्रतिक्रियांची झोड
विराट कोहली

मुंबई : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध एंटिगामध्ये कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणारा विराट कोहली पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या टीकांचा धनी झाला आहे. यावेळी निमित्तही तसंच आहे. पहिल्या खेळीत अवघ्या ९ धावांवर तंबूत परणाऱ्या विराटने क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. ज्यानंतर त्याने ड्रेसिंगरुममध्ये काही क्षण व्यतीत केल्याचं पाहिलं. 

कॅमेऱ्यांची आणि चाहत्यांची सतत नजर असणारा विराट यावेळी स्टीव्हन सेल्वेस्टर लिखित 'डिटॉक्स युअर इगो', हे पुस्तक वाचताना दिसला. ज्यासंबंधीचा त्याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यानंतर आता सोशल मीडियावर विराटला नानाविध प्रतिक्रियांना विशेष म्हणजे बऱ्याच अंशी उपरोधिक टीकांना सामोरं जावं लागत आहे. 

आपल्या प्रभावी खेळामुळे विराट कितीही चर्चेत असला तरीही त्याची आक्रमक वृत्ती, अहंकार आणि अतिआत्मविश्वासूपणा अनेकदा कित्येकांना खटकतो. परिणामी त्याने हे पुस्तक वाचणं अतिशय फायद्याचं ठरेल, असं म्हणत नेटकऱ्यांनी विराटची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. एका गरजू व्यक्तीसाठी तितकंच महत्त्वाचं पुस्तक असं म्हणत एका नेटकऱ्य़ाने विराटचा फोटो पोस्ट केला. 

तू सर्वोत्तम आहेस खरा. पण, खरंच तुला या पुस्तकाची गरज होती असं लिहित दुसऱ्या एका युजरने विराटवर उपरोधिक निशाणा साधला. रोहित शर्मासोबतच्या विराटच्या नात्याला लक्ष्य करत हे पुस्तक तुला त्याच्याकडून तर मिळालं नाही ना... असंही युजर्स म्हणताना दिसले.