कोलंबो : भारतीय टीम श्रीलंकेमध्ये निडास टी-20 ट्रायसीरिज खेळत आहे. भारताचा पुढचा सामना सोमवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-20 गमावल्यानंतर बांग्लादेशविरुद्धची टी-20 मॅच भारतानं जिंकली होती. तिसऱ्या मॅचच्या आधी भारतीय टीमचे खेळाडू हॉटेलमध्ये मजा मस्ती करताना दिसले. सुरेश रैनानं किशोर कुमार यांचं गाणं ये शाम मस्तानी गुणगुणलं. ऋषभ पंतबरोबरच इतर भारतीय खेळाडूंनीही रैनाला साथ दिली.
बीसीसीआयनं त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून सुरेश रैनाला टॅग करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही रैनाला मैदानात बघितलं असेल पण किशोर कुमारचं गाणं गाताना बघितलं आहे का? असं कॅप्शन बीसीसीआयनं या ट्विटला दिलं आहे.
VIDEO: You've seen him on the field, but ever seen him SING a Kishore Kumar classic? Presenting - @ImRaina the SINGER #TeamIndiahttps://t.co/yhvRwmbnDd pic.twitter.com/llB03VW4fH
— BCCI (@BCCI) March 11, 2018
या सीरिजमध्ये किशोर कुमारनं २९ रन्स केल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध रैना १ रनवर आऊट झाला तर बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये रैनानं २८ रन्स केल्या. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रैनानं २७ बॉल्समध्ये ४३ रन्स केल्या होत्या. तर ३ ओव्हरमध्ये २७ रन्स देऊन १ विकेटही घेतली होती. आफ्रिकेतली टी-20 सीरिज भारतानं २-१नं जिंकली होती. तसंच वनडेमध्येही पुनरागमन करु असा विश्वास रैनानं व्यक्त केला होता.