कोलकाता : भारत आणि श्रीलंकेमधली पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत चाललेला हा रोमहर्षक सामना ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं. पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेनं १२२ रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीच्या नाबाद शतकामुळे भारतानं सन्मानजनक स्कोअर केला.
विराट कोहलीनं ११९ बॉल्समध्ये नाबाद १०४ रन्सची खेळी केली. कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १८वं शतक आहे. याचबरोबर कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतकं झाली आहेत. विराटनं वनडेमध्ये आत्तापर्यंत ३२ शतकं झळकावली आहेत. सर्वात जलद ५० शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डची विराटनं बरोबरी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला आणि विराट कोहलीनं ३४८ इनिंगमध्ये ५० शतकं झळकावली आहेत. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतकं झळकावायला ३७६ इनिंग लागल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगनं ४१८ इनिंगमध्ये एवढी शतकं पूर्ण केली होती.
गावसकर यांच्या रेकॉर्डची बरोबरी
या शतकाबरोबरच विराट कोहलीनं सुनील गावसकर यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. कोहलीनं कर्णधार असताना आत्तापर्यंत ११ शतकं झळकावली आहेत. गावसकर यांनीही भारतीय टीमचा कॅप्टन असताना एवढीच शतकं झळकावली होती.
सचिननं आजच केलं होतं रेकॉर्ड
आजच्याच दिवशी २००९मध्ये सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजार रन्सचा टप्पा गाठला होता. श्रीलंकेविरुद्ध अहमदाबादमध्ये सचिननं हे रेकॉर्ड केलं होतं.
सचिनचं ते रेकॉर्ड किती लांब?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतकं सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. या रेकॉर्डच्या बाबतीत विराट कोहली सध्या आठव्या क्रमांकावर आहे. पॉटिंगनं ७१, संगकारानं ६३, जॅक कॅलीसनं ६२, जयवर्धनेनं ५४, लारानं ५३ आणि अमलानं ५१ शतकं झळकावली आहेत.